पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ सोमवारी (२९ एप्रिल) पुण्यात सभा घेतली. या सभेत बोलत असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका केली. मोदींनी पवारांचा भटकती (अतृप्त) आत्मा असा उल्लेख केला. मोदींनी शरद पवारांचं नाव घेतलं नव्हतं, मात्र त्यांचा रोख शरद पवारांकडे होता अशी चर्चा आहे. मोदींच्या ‘अतृप्त आत्मा’ या टीकेवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख (अजित पवार गट) अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अतृप्त आत्मा नक्की कोण आहे ते विचारणार आहे. तसेच त्यांनी नेमक्या कोणत्या उद्देशाने ते वक्तव्य केलं हेदेखील विचारेन.
अजित पवार म्हणाले, पंतप्रधान नेमकं कोणाबद्दल बोलले ते माहिती असायला मी काही ज्योतिषी नाही. त्यांच्या मनात नक्की कोण ते… त्याबाबतीत मी पुढच्या सभेत मोदींना विचारेन… आमची पुढची प्रचारसभा जिथे असेल आणि तिथे मीदेखील असेन तर मी तेव्हा मोदींना त्या वक्तव्याबाबत विचारेन… भटकत्या आत्म्याचं नाव काय तेदेखील विचारेन. त्यांनी नेमका कोणत्या उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे वक्तव्य केलं त्याबाबतही विचारेन. त्यांनी मला नाव सांगितलं की मी ते तुम्हाला (प्रसारमाध्यमांना) सांगेन.
नरेंद्र मोदी काय म्हणाले होते?
पुण्यातील सभेत मोदी म्हणाले होते, “आपल्याकडे म्हणतात काही अतृप्त आत्मे असतात. ज्यांची स्वप्नं पूर्ण झाली नाहीत ते लोक दुसऱ्याच्या स्वप्नांमध्ये माती कालवतात. ४५ वर्षांपूर्वी इथल्या एका मोठ्या नेत्याने आपल्या महत्त्वाकांक्षेसाठी या खेळाची सुरुवात केली. तेव्हापासून महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण झाली आहे. अनेक मुख्यमंत्री त्यांचा कार्यकाळही पूर्ण करु शकले नाहीत. ते केवळ विरोधी पक्षालाच अस्थिर करत नाही तर आपल्या पक्षात, कुटुंबातही ते असंच करतात. १९९५ मध्येही हा अतृप्त आत्मा शिवसेना भाजपाचं सरकार अस्थिर करु पाहात होता. २०१९ मध्ये या अतृप्त आत्म्याने काय केलं ते महाराष्ट्राला माहीत आहेच. आता या अतृत्प आत्म्याने देश अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.”
हे ही वाचा >> नरेंद्र मोदींचा पुन्हा शरद पवारांवर हल्लाबोल, “महाराष्ट्रातल्या एका दिग्गज नेत्याने ९० च्या दशकापासून..”
रोहित पवारांचा मोदींना प्रत्युत्तर
मोदींच्या शरद पवारांवरील टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. रोहित पवार म्हणाले, महाराष्ट्र हे आमचं शरीर म्हणजेच पंढरी आहे आणि विठ्ठल हा या पंढरीतला आत्मा आहे. म्हणूनच स्वतःचं आसन अस्थिर झाल्याचं लक्षात येताच मोदींना महाराष्ट्राची आठवण झाली, पण इथे येऊन त्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेण्याऐवजी त्यांना अस्थिर आत्मे दिसू लागले आहेत.