Ajit Pawar on Batenge to Katenge by Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सध्या विधानसभा निवडणुकीत भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात फिरत आहेत. यादरम्यान त्यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा देत हिंदू समुदायाला सावधानतेचा इशारा दिला होता. त्यांच्यानंतर इतर भाजपा नेत्यांनी व शिवसेनेच्या (शिंदे) नेत्यांनी हा नारा उचलून धरला. मात्र महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (अजित पवार) या घोषणेपासून आंतर राखलं आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवीन घोषणा दिली. ‘एक हैं तो सेफ हैं’, असं ते म्हणाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात या दोन्ही घोषणांची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, “आम्ही घोषणांशी सहमत नाही”, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.
आमचा पक्ष पुरोगामी विचारांचा आहे, असा दावा करणाऱ्या अजित पवारांची योगी आदित्यनाथांच्या घोषणेमुळे मोठी गोची झाल्याचं पाहायला मिळत आहे. यावर अजित पवारांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले, “पंतप्रधान मोदींच्या सबका साथ सबका विकास या घोषणेमुळे आम्ही सगळे एकत्र आलो आहोत. आपण सगळे एकत्र आहोत, सुरक्षित आहोत, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्या ‘सब एक हैं’मध्ये सर्व जातीधर्माचे लोक आले”.
अल्पसंख्याकांसाठी आमच्या सरकारने खूप कामं केली : अजित पवार
उपमुख्यमंत्री म्हणाले, “आमच्या सरकारने दीड वर्षात अल्पसंख्याकांसाठी जितके निर्णय घेतले, तितके निर्णय आजवर कोणी घेतले नाहीत. आम्ही मौलाना आझाद महामंडळाला एक हजार कोटी रुपयांचं भागभांडवल दिलं. काँग्रेसच्या आजवरच्या कारकिर्दीत कोणीही इतके पैसे दिले नव्हते. आम्ही अल्पसंख्याकांसाठी अर्थसंकल्पात एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली. प्रत्येक तालुक्यांना अल्पसंख्याकांचा निधी दिला. मदरशांना दिलं जाणारं मानधन सहा हजार रुपयांवरून १६ हजार केलं. जिथे आठ हजार दिले जात होते तिथे १८ हजार रुपये देत आहोत. अल्पसंख्याकांसाठी वेगळी ‘मार्टी’ ही संस्था काढली. आजवर इतर जातींसाठी, समुदांयासाठी अशा संस्था होत्या. आम्ही अल्पसंख्याकांसाठी अशी संस्था काढली”. अजित पवार एबीपी माझाशी बोलत होते.
हे ही वााचा >> Justice Chandiwal : “सचिन वाझे आणि अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांना गुंतवण्याचा प्रयत्न केला, मी..”, जस्टिस चांदिवाल यांचा खुलासा
दरम्यान, अजित पवारांना विचारण्यात आलं की, योगी आदित्यनाथांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेशी तुम्ही सहमत आहात का? यावर अजित पवार म्हणाले, “मी सहमत नाही. मला ते मान्य नाही. आम्ही शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचे लोक आहोत”. यावर अजित पवाराना विचारण्यात आलं की तुमच्या पक्षाच्या व भाजपा-शिवसेनेच्या (शिंदे) विचारधारा, भूमिका वेगळ्या आहेत त्याबद्दल काय सांगाल? यावर अजित पवार म्हणाले, “विचारधारा वेगळी असली तरी सध्या महाराष्ट्रात तशी स्थिती आहे. उद्धव ठाकरे देखील काँग्रेसबरोबर गेले आहेत. तुमच्या विचारधारा वेगळ्या असल्या तरी युतीचा किमान समान कार्यक्रम तयार आहे. राज्याच्या व जनतेच्या भल्यासाठी तडजोडी कराव्या लागतात”.
© IE Online Media Services (P) Ltd