लोकसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार असून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या कलांनुसार देशात एनडीए आघाडीवर आहे. याच दरम्यान मतमोजणीच्या पूर्वसंध्येला समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांनी केलेल्या एका पोस्टने लक्ष वेधून घेतलं आहे. कार्यकर्त्यांना नजरकैदेत ठेवलं जात आहे, असा आरोप अखिलेश यादव यांनी एक व्हिडीओ शेअर करून केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अखिलेश यादव यांनी एक्सवर केलेल्या या पोस्टमध्ये सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग, पोलीस आयुक्त व उत्तर प्रदेश पोलिसांना टॅग केलं आहे. मिर्झापूर, अलिगढ, कन्नौज व उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना नजरकैदेत ठेवून बेकायदेशीर काम करत आहेत. हे कार्यकर्ते मतमोजणीत भाग घेऊ शकणार नाहीत, यासाठी हे सगळं केलं जात आहे. या प्रकरणाची तत्काळ दखल घ्या. प्रत्येकाला आपल्या मताचे रक्षण करण्याचा अधिकार आहे. जेव्हा कोर्टाने लावलेल्या कॅमेऱ्यांसमोरही मतांची हेराफेरी करणारे सरकार सत्तेत असते तेव्हा ही जबाबदारी आणखी वाढते.

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Live Updates : महाराष्ट्रातील जनतेचा कौल कुणाला? ‘एनडीए’ की ‘इंडिया’

अशा घटना तत्काळ थांबल्या पाहिजेत व प्रशासनाने नजरकैदेत ठेवलेल्या लोकांना ताबडतोब सोडण्यात यावं. सर्व राजकीय पक्ष शांततेत काम करत असताना सरकार आणि प्रशासनाने असे कोणतेही अनैतिक काम करू नये, ज्यामुळे लोकांमध्ये असंतोष निर्माण होईल. अशा पक्षपाती डीएम आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना तत्काळ हटवलं जाईल आणि शांततेत मतमोजणी होईल, अशी आशा आहे, असं अखिलेख यादव यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

अपेक्षित जागा न मिळाल्यास इंडिया आघाडी काय करणार? ‘हा’ असेल निकालानंतरचा प्लॅन ऑफ अ‍ॅक्शन, काँग्रेसने सर्व वरिष्ठ नेत्यांना…

अखिलेश यादव यांनी त्यांच्या पोस्टबरोबर एक तीन मिनिटांचा व्हिडीओदेखील शेअर केला आहे. यात एका घराबाहेर काही गाड्या व पोलीस दिसत आहेत. याठिकाणी कार्यकर्त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे.

Video: “…तर महाभारताचा संग्राम होईल”, बिहारमधील अपक्ष उमेदवार पप्पू यादव यांचा इशारा; म्हणाले, “कफन बांधकर आए…”

अखिलेश यादव यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास ते उत्तर प्रदेशमधील कन्नौज मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. सुरुवातीच्या कलांनुसार, अखिलेश आघाडीवर आहेत. अखिलेश यादव यांच्या विरोधात भाजपाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार सुब्रत पाठक आहेत. सुरुवातीचे कल पाहता यादव आघाडीवर आहेत आणि या मतदारसंघात कोण विजयी होतं, ते लवकरच कळेल.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akhilesh yadav allegations about opposition workers under house arrest share video hrc