राहुल गांधी यांनी अमेठीतून निवडणूक लढून दाखवावी असं आव्हान देणाऱ्या आणि मागच्या निवडणुकीत राहुल गांधींचा पराभव करणाऱ्या स्मृती इराणी या खेपेला पिछाडीवर आहेत. मतमोजणीचे जे सुरुवातीचे कल हाती आले आहेत त्यातून हे चित्र आहे काँग्रेसचे किशोरीलाल हे २० हजार मतांनी आघाडीवर आहेत. आता नेमकं या मतदारसंघात काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
उत्तर प्रदेशात काँटे की टक्कर
उत्तर प्रदेशातल्या ८० जागांवर सध्याच्या घडीला काँटे की टक्कर सुरु आहे. भाजपाला या ठिकाणी बहुदा ४० ते ४२ जागांवरच समाधान मानावं लागेल असं दिसतं आहे. कारण इतर ठिकाणी काँग्रेस आणि पाने आघाडी घेतली आहे. उत्तर प्रदेशातल्या अयोध्येतही समाजवादी पक्षाचा उमेदवार आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशातला महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे अमेठी. या अमेठी मतदारसंघातून स्मृती इराणी पिछाडीवर आहेत असं दिसतं आहे.
Lok Sabha Election Results Live Updates : सेक्स स्कँडल प्रकरणात अडकलेले प्रज्वल रेवण्णा पराभूत!
सुरुवातीला असा अंदाज वर्तवण्यात आला होता की अमेठीतून राहुल गांधी ही जागा लढवतील आणि रायबरेलीतून सोनिया गांधी निवडणूक लढवतील. मात्र तसं घडलं नाही. सोनिया गांधी राजस्थानच्या जागेवरुन राज्यसभेवर गेल्या आहेत. तर किशोरीलाल शर्मांना अमेठीतून उमेदवारी देण्यात आली. ज्यानंतर आता किशोरीलाल शर्मांनी चांगली कामगिरी करत स्मृती इराणींना मागे टाकलं आहे. एक्झिट पोल्समध्येही स्मृती इराणींना ही जागा जिंकणं कठीण असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. आता निकालांमध्येही ही जागा त्यांच्यासाठी कठीण असल्याचंच दिसून येतं आहे.
भाजपाचा ४०० पारचा नारा हवेत विरला?
भाजपाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा दिला. याआधी भाजपाने २०१४ आणि २०१९ या निवडणुकीत भाजपाने बहुमत मिळवलं होतं. यावेळी भाजपाने स्वतः ३७० जागा जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. मात्र दुपारपर्यंत जे कल हाती येत आहेत त्यावरुन भारतीय जनता पार्टी एनडीएसह फारतर ३०० ची संख्या पार करेल असं दिसतं आहे.
भाजपाने आत्तापर्यंत किती जागांवर लढवली निवडणूक?
आपण जाणून घेऊ भाजपाने २०१४ मध्ये किती जागा लढवल्या आणि २०१९ मध्ये किती जागा लढवल्या? २०१४ मध्ये भाजपाने ४२८ जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी २८२ जागा भाजपाने जिंकल्या होत्या. तर २०१९ ला भाजपाने ४३६ जागांवर निवडणूक लढवली आणि ३०३ जागा मिळवल्या होत्या. भाजपाने २०१४ आणि २०१९ या दोन्ही वर्षांमध्ये बहुमताच्या संख्येपक्षा जास्त जागा मिळवल्या. आता या खेपेला म्हणजेच २०२४ मध्ये भाजपाने ४४१ जागा लढवल्या आहेत. तर १०२ जागा मित्र पक्षांना दिल्या आहेत. आता या यावेळी ४४१ पैकी ३७० जागा भाजपा जिंकतंय का हे आज स्पष्ट होणार आहे. २०१९ मध्ये भाजपाला जी मतं मिळाली त्याची सरासरी २०१४ च्या तुलनेत अधिक होती. २०१९ मध्ये भाजपाच्या विजयाचा स्ट्राईक रेट हा ६९ टक्क्यांवर पोहचला होता. आता या वेळी काय निकाल लागतो? एकट्या भाजपाला किती जागा मिळतात हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.