Parvesh Verma Defeated Arvind Kejriwal : दिल्ली विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष दमदार विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. यामध्ये भाजपा उमेदवार प्रवेश वर्मा यांनी विजय मिळवला असून, त्यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पराभवाचा धक्का दिला आहे. याआधी अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडणूक जिंकली होती. मात्र, यावेळी भाजपाचे प्रवेश वर्मा यांनी त्यांना नवी दिल्ली मतदारसंघातून पराभवाची चव चाखायला लावली आहे.
प्रवेश वर्मा यांच्या या विजयानंतर, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांचे निवडणूक प्रचार सभेतील भाषण व्हायरल होत आहे. या भाषणाच्या एका छोट्या क्लिपमध्ये अमित शाह म्हणतात की, त्यांनी प्रवेश वर्मा यांना त्यांच्या घरी बोलावले होते आणि त्यांना सांगितले होते की जर तुम्हाला निवडणूक लढवायची असेल तर, तुम्ही दुसऱ्या जागेवरून निवडणूक लढवावी. दरम्यान, प्रवेश वर्मा यांनी हे भाषण सुमारे एक आठवड्यापूर्वी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते. आता त्यांच्या विजयानंतर हा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.
अमित शाह यांचा व्हिडिओ व्हायरल
व्हायरल व्हिडिओमध्ये अमित शाह म्हणत आहेत की, “प्रवेश वर्मा हे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार आहेत. त्यांचे वडील साहिब सिंग वर्मा दिल्लीचे मुख्यमंत्री होते. प्रवेश वर्मा यांची परंपरा आहे की, जिथून ते निवडून येतात, तिथे ते कोणालाही तक्रार करण्याची संधी देत नाहीत. मी प्रवेश यांना फोन करून घरी बोलवत सांगितले होते, की ते एक चांगले व्यक्ती आहेत, त्यांनी दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी. यावर प्रवेश वर्मा म्हणाले, नाही, मी जिंकेन. जर मी लढलो तर फक्त केजरीवाल यांच्याविरुद्धच लढेन.”
मुख्यमंत्रीपदाचे दावेदार
नवी दिल्ली मतदारसंघातून प्रवेश वर्मा यांनी आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत प्रवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल तसेच काँग्रेसचे संदीप दीक्षित यांचा पराभव केला आहे. दरम्यान भाजपाने दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात बाजी मारल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे भाजपाकडून प्रवेश वर्माही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असणार आहेत.