Premium

मित्रपक्षांपुढे भाजपचे नमते? अमित शहांबरोबर साडेतीन तास चर्चा; २० ते २३ जागांवरील अद्याप तिढा कायम

दिल्लीतील शहांच्या निवासस्थानी गुरुवारी सुमारे साडेतीन तास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी शहांशी चर्चा केली.

amit shah meets mahayuti leaders in delhi to sort out seat sharing issue
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी शहांशी चर्चा केली.

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मध्यस्थीनंतर महायुतीतील जागावाटपाचा गुंता मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे असले तरी शिवसेनेचा शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने आक्रमक धोरण घेतल्याचे चित्र आहे. हे दोन्ही गट भाजपकडून अधिक जागा पदरात पाडून घेण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्लीतील शहांच्या निवासस्थानी गुरुवारी सुमारे साडेतीन तास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी शहांशी चर्चा केली. महायुतीमध्ये २० ते २३ जागांवरील वाद अजून मिटलेला नसून त्यातील १०-१५ जागांवर सहमती होण्याची शक्यता आहे. मात्र अन्य ७ ते ८ जागांसाठी महायुतीतील घटक पक्ष कमालीचे आग्रही असल्यामुळे गुंतागुंत वाढली आहे. त्यामुळेच अखेर शहांना मध्यस्थी करावी लागली आहे. गेल्या आठवड्यामध्ये दिल्लीत झालेल्या बैठकीत शिंदे व पवार गटाला जास्त जागांची मागणी न करण्याची सूचना शहा यांनी केल्याचे सांगितले जाते. मात्र, लोकसभा निवडणुकीमधील कामगिरी पाहता आम्हाला अधिक जागा मिळाल्या पाहिजेत, अशी ठाम भूमिका शिंदेंनी घेतल्याचे समजते. अजित पवार गटानेही तडजोड करण्यास तयार नकार दिला आहे. गुरुवारच्या बैठकीत मित्रपक्षांना न दुखवता काही जागा सोडण्याचे सांगून भाजपने समन्वयाची भूमिका घेतल्याचे समजते. त्यामुळे जागावाटपाचा तिढा जवळपास सुटल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

हेही वाचा >>> Zeeshan Siddique : “बाबा मला तुमची रोज आठवण…”; झिशान सिद्दिकींची बाबा सिद्दिकींबाबत भावूक पोस्ट

भाजपने ९९, शिंदे गटाने ४५ तर अजित पवार गटाने ३८ जागांची पहिली यादी जाहीर केली असून तीनही पक्षांची उमेदवारांची उर्वरित यादीही तयार आहे. पण, शिंदे व अजित पवार गटाची अधिक जागांची मागणी मान्य केल्यास भाजपला अपेक्षेपेक्षा कमी जागा लढवाव्या लागू शकतात.

शिंदे नाराज की, निरोपच मिळाला नाही?

ही बैठक खरे म्हणजे बुधवारी रात्री होणार होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे न आल्यामुळे ती लांबणीवर टाकावी लागली. मुख्यमंत्री बुधवारी कामाख्या देवीच्या दर्शनासाठी आसामला गेले होते. त्यांना शहांच्या बैठकीचा निरोप मिळालाच नाही असा दावा केला जात आहे. मात्र, शिंदे यांनी बैठकीला एक दिवस उशीर करून महायुतीतील घटक पक्षांवर दबाव वाढविल्याचीही चर्चा आहे. गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या बैठकीनंतरही शिंदे चोवीस तास दिल्लीतच तळ ठोकून होते.

बंडखोरी टाळण्याचा सल्ला

पहिली यादी जाहीर झाल्यानंतर भाजपला बंडखोरीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. बंडखोरीचा मोठा फटका महायुतीला बसू शकतो. त्यामुळे पक्षातील बंडखोरीबाबत शहांनी चिंता व्यक्त केली असून महायुतीतील घटक पक्षांना बंडखोरी टाळण्याची सूचना केल्याचे समजते.

आता केवळ १० जागांवर चर्चा सुरू असून त्यावर लवकरच मार्ग काढला जाईल. उद्या (शुक्रवारी) भाजपची दुसरी यादी जाहीर केली जाईल. – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Amit shah meets mahayuti leaders in delhi to sort out seat sharing issue zws

First published on: 25-10-2024 at 04:45 IST
Show comments