संगमनेर : संगमनेर विधानसभेची जागा महायुतीत अखेर शिवसेनेच्या शिंदे गटाकडे गेली. त्यांनी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात युवा कार्यकर्ते अमोल खताळ यांना येथून उमेदवारी जाहीर केली. खताळ हे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचे कट्टर समर्थक, भाजपाचे कार्यकर्ते होते. त्यांनी आता शिवसेनेत प्रवेश केला असून त्याआधीच त्यांची उमेदवारीही घोषित झाली आहे. याशिवाय माजी खासदार सुजय विखे संगमनेरातून उमेदवारी करणार नाहीत हा लोकसत्ताने प्रथमपासूनच वर्तवलेला अंदाजही खरा ठरला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संगमनेरची जागा महायुतीत कोणाकडे जाणार आणि थोरात यांच्या विरोधात यावेळी उमेदवार कोण असणार याबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता होती. यापूर्वी भाजप शिवसेना युतीत ही जागा शिवसेनेकडे होती. त्यामुळे यावेळी शिवसेनेच्या शिंदे गटाकडे ही जागा जाईल अशीच चिन्हे होती. परंतु सुजय विखे यांनी आपणच संगमनेरमधून भाजपाचे उमेदवार असणार असे सांगत तालुक्यात एकापाठोपाठ सभा घेण्याचा धडाकाही सुरू केला होता. त्यामुळे विविध कारणांनी तालुक्यातील वातावरण गेल्या आठ, पंधरा दिवसांपासून ढवळून निघाले होते. असे असतानाही दक्षिणेत झालेला पराभव आणि संगमनेरातूनही निराशा पदरी पडण्याची शक्यता असल्याने विखे स्वतः उमेदवारी करणार नाहीत असा अंदाज लोकसत्ताने वर्तविला होता, तो तंतोतंत खरा ठरला.

हेही वाचा – Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?

हेही वाचा – Sharad Pawar NCP 5th Candidate List : मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पाचवी यादी जाहीर; माढा मतदारसंघात दिली ‘या’ नेत्याला उमेदवारी

राज्यात जवळपास सगळ्या ठिकाणचे उमेदवार घोषित होत असताना महायुतीचा संगमनेरचा उमेदवार घोषित होत नव्हता. त्यामुळे येथे काही घडामोडी घडवून धक्कादायक चेहरा समोर येतो काय याबाबतही वेगवेगळे तर्कवितर्क केले जात होते. त्या सगळ्याला पूर्णविराम मिळाला असून अखेर विखे समर्थक अमोल खताळ यांना शिवसेनेत घेऊन त्यांची उमेदवारी काल रात्री उशिरा जाहीर करण्यात आली. जागा भाजपच्या वाट्याला न आल्याने मूळ भाजपा समर्थकही काहीसे नाराज झाले. तालुक्यात काँग्रेस वगळता महाविकास आघाडी व महायुतीतील इतर सर्व पक्ष्यांची ताकद तोळा मासाच आहे. शिंदेंच्या शिवसेनेचीही तालुक्यात ताकद बेतास बेत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर खताळ यांची भिस्त मंत्री विखे यांच्यावर, अर्थात भाजपावरच असणार आहे. आजवरच्या निवडणुकांत आमदार थोरात यांच्या विरोधात कोणत्याही पक्षाचा कोणीही उमेदवार असला तरी ४० ते ६० हजारांच्या दरम्यान मते त्यांना मिळालेली आहेत. या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत खताळ किती मते खेचून आणतात, थोरात यांच्यासमोर किती तगडे आव्हान उभे करतात हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amol khatal of shivsena against former minister mla thorat from sangamner ssb