Amol Kolhe On Devendra Fadnavis: विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे तीन दिवस उरले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या प्रचाराची धार वाढवली आहे. सर्वच नेते आपापल्या विरोधकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. अशात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे प्रमुख नेते असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख करत, राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार नसल्याचे म्हटले आहे.

काय म्हणाले खासदार अमोल कोल्हे?

पुण्यात महाविका आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करत असताना खासदार अमोल कोल्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अमोल कोल्हे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षरित्या राज्यात महायुतीचे सरकार येणार नाही याची कबुली दिली आहे. देवेंद्र फडणवीस यापूर्वी म्हणाले होते की, ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाहीत. याचाच अर्थ असा की, महायुतीचे सरकारच येणार नाही.”

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही: फडणवीस

काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाइम्स ग्रुपला एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीमध्ये फडणवीस म्हणाले होते की, “भाजपचा मुख्यमंत्री व्हावा ही कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची भावना असणे स्वाभावीक आहे. आघाडी वा युतीचे राजकारण वास्तवावर आधारित असते. तिथे भावनेला प्राधान्य देता येत नाही. घटक पक्षांना बरोबर घेऊन पुढे जात असताना आमच्या सर्व आकांक्षा पूर्ण होतीलच, असे नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची कोणतीही शर्यत नाही आणि असल्या शर्यतीत मी सहभागीही नाही.”

हे ही वाचा: “शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याकडून २५ लाखांची मागणी,” काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा आरोप

कोण मारणार बाजी?

राज्यात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीत एकीकडे महायुती आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी. महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा समावेश आहे. महाविकास आघाडीतून काँग्रेस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढत देत आहे.

दरम्यान सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशात जरी एनडीएचे सरकार आले असले तरी, राज्यात महाविकास आघाडीने ३० पेक्षा अधिक जागा जिंकल्या होत्या. यामध्ये काँग्रेसने १३, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ९ आणि शरद पवार यांच्या ८ जागा निवडून आल्या होत्या. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता सत्तेच्या चाव्या कोणाच्या हातात देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.