भारतीय जनता पार्टीच्या अमरावती लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा या सध्या मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपा आणि महायुतीचे नेते, पदाधिकारी पूर्ण ताकदीनिशी नवनीत राणांचा प्रचार करत आहेत. दरम्यान, नवनीत राणा यांची आज अमरावतीमध्ये एक प्रचारसभा पार पडली. या सभेच्या आयोजनावेळी नवनीत राणा यांनी केलेली एक चूक त्यांना आणि महायुतीला महागात पडू शकते. या सभास्थळी कुठेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाने आक्षेप नोंदवला आहे.
नवनीत राणांच्या सभेत अजित पवारांचा फोटो टाळणं ही मोठी चूक असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केलं आहे. नवनीत राणांच्या सभेत अजित पवारांचा फोटो नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटातील नेत्यांमध्ये नाराजी पसरली असून स्थानिक नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आपली नाराजी वरिष्ठांपुढे मांडली आहे. दरम्यान, नवनीत राणांनी महायुतीचा धर्म पाळला पाहिजे, असं वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलं आहे. नवनीत राणांनी चूक दुरुस्त करावी, अन्यथा त्यांना या चुकीची मोठी किंमत मोजावी लागेल, अशा इशारा मिटकरी यांनी दिला आहे.
अमोल मिटकरी म्हणाले, अमरावतीमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होत असून या सभेत कुठेही अजित पवार यांचा फोटो लावलेला नाही. अजित पवारांचा फोटो टाळणं ही नवनीत राणांची मोठी चूक आहे. नवनीत राणांनी महायुतीचा धर्म पाळला पाहिजे. महायुतीत ऐनवेळी मिठाचा खडा का टाकताय? याचं उत्तर नवनीत राणांनी द्यावं. नाहीतर दोन दिवसांत निवडणूक होणारच आहे, त्या निवडणुकीत तुम्हाला याची मोठी किंमत मोजावी लागेल.
हे ही वाचा >> “काँग्रेस की लूट जिंदगी के साथ भी, बाद भी”, वारसा करावरून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
अंजनगावात नवनीत राणांना शेतकऱ्यांचा विरोध
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी अमरावती लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. आज (२४ एप्रिल) प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, काल (२३ एप्रिल) श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी मतदारसंघातील हनुमान मंदिरांना भेटी दिल्या. मात्र अंजनगाव तालुक्यातील चौसाळा गावात हनुमान मंदिरात दर्शनासाठी गेले असता त्यांना मतदारांच्या संतापाचा सामना करावा लागला. खासदार नवनीत राणा चौसाळा गावातील मंदिरात दर्शन घेऊन परत जात असताना काही तरूण शेतकऱ्यांनी त्यांना घेराव घातला. मंदिरापासून थोड्या अंतरावर असलेले एक फलक पाहण्यासाठी आमच्याबरोबर चला, अशी मागणी या लोकांनी केली. मात्र रात्रीचे १२ वाजले असून मला अजूनही चार ते पाच गावांमध्ये जायचे असल्याचे सांगून नवनीत राणा यांनी त्या लोकांबरोबर जाण्यास नकार दिला. तसेच तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, त्या इथेच सांगा, असेही सांगितले. मात्र शेतकरी त्यांना फलक बघायला चलाच, या हट्टावर पेटले होते. त्यावेळी शेतकरी आणि नवनीत राणांमध्ये मोठा वाद झाल्याचं पाहायला मिळालं.