अमरावतीमध्ये महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्यात लोकसभा निवडणूक घोषित झाल्यापासून वाद सुरू आहेत. अमरावतीमध्ये महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्यात लोकसभा निवडणूक घोषित झाल्यापासून वाद सुरू आहेत. त्यातच २३ आणि २४ एप्रिलसाठी अमरावतीच्या सायन्स कोर मैदानात बच्चू कडूंना उमेदवार दिनेश बुब यांच्या सभेसाठी निवडणूक आयोगाकडून परवानगी देण्यात आली होती. मात्र त्याच मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे नवनीत राणा यांच्यासाठी सभा घेणार असल्यामुळे बच्चू कडू यांना नियमानुसार दिलेली परवानगी सुरक्षेचे कारण देऊन रद्द करण्यात आली आणि त्यानंतर या मैदानावर आता अमित शाह यांची सभा होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर बच्चू कडू यांनी पोलिसांसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. या सगळ्यात जो राडा झाला त्यानंतर बच्चू कडूंची प्रतिक्रिया समोर आली आहे.
बच्चू कडू काय म्हणाले?
“मला टी. एन. शेषन यांची आठवण येते आहे. ते आज असते तर या प्रकरणाचा पर्दाफाश झाला असता. २२ तारखेला भाजपाला संमती नाकारली. २३ आणि २४ ला संमती दिली. आमची उद्या (२४) सभा आहे आणि आमची परवानगी तोच अधिकारी नाकारतो आहे. ही हुकूमशाही आहे. मी एक सच्चा नागरिक म्हणून याकडे पाहिलं तर हा जुलूम आहे. गृहमंत्र्यांच्या सभेच्या निमित्ताने कायदा तोडला जातो आहे. कायद्याचं राज्य संपलं आहे असं वाटतं. आम्ही आता कोर्टात जाणार आहोत” असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- Photo : अमित शाहांच्या सभेचा मंडप कोसळला, बच्चू कडू म्हणाले, “हनुमानजींनी…”
आम्ही आता मैदान कुठे शोधायचं?
“नवनीत राणांबाबत १२७ पानांचा अहवाल आहे. तो दोन पानांमध्ये उलटसुलट करण्यात आला. २२ तारखेला मैदानाची संमती भाजपाला नाकारली आहे. आता आम्हाला आज संमती नाकारत आहेत. मैदान बघायला कुठे जायचं? आचारसंहितेचा भंगच इथल्या पोलीस प्रशासनाने केला आहे. एखाद्याच्या घरात जाऊन डाका घालायचा, खून करायचा, घर पेटवायचं अशासारखीच ही घटना मला वाटते आहे. आता जनतेने या घटनेचं उत्तर दिलं पाहिजे. पाच तास प्रचार पोलिसांनी थांबवला. हा आचारसंहितेचा भंग आहे. आम्ही आता याविरोधात न्यायालयात लढा देणार आहोत “असं बच्चू कडू म्हणाले आहेत.
माझ्या अटकेचा कट आखला होता
“ही निवडणूक अत्यंत शांततेत होणं ही आमची जबाबदारी आहे. राणाचा व्यवस्थित प्लॅन होता की उमेदवार आणि बच्चू कडूला अटक करायची. आम्ही रागात यावं, काहीतरी कृत्य घडवलं जाईल आणि आम्हाला त्या गुन्ह्याखाली अटक होईल असा प्लॅन राणा दाम्पत्याने आखला होता. असा आरोप बच्चू कडूंनी केला. राणा यांचं म्हणणं पोलीस ऐकतात. पोलीस भाजपाचे कार्यकर्ते असल्यासारखं वागत आहेत. आता लोक मतदानातून याचं उत्तर देतील. आमच्या आक्रमक भूमिकेमुळे काही वाईट होत नाही ना हे आम्ही पाहतो आहोत. आता आम्ही जनतेसमोर जाऊ आणि पुढचा निर्णय जाहीर करु” असं बच्चू कडूंनी म्हटलं आहे.