कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसने प्रतिष्ठा पणाला लावली. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपा आणि विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते प्रचारासाठी मैदानात उतरले. भाजपाच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांपासून अनेक मंत्री आणि मुख्यमंत्री कर्नाटकात तळ ठोकून होते. दुसरीकडे काँग्रेसच्या प्रचारासाठी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधींपासून काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते होते. अखेर शनिवारी (१३) या चुरशीच्या लढतीचा निकाल लागला. यात काँग्रेसने भाजपाचा दारूण पराभव केला. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी यावर प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमृता फडणवीस म्हणाल्या, “कर्नाटकसारखं राज्य संधी देत आहे. काल आम्ही कर्नाटकमध्ये सत्तेत होतो, आज काँग्रेस आहे आणि उद्या आणखी कोणी असेल. ते कर्नाटक राज्यासाठी चांगलंच आहे. त्याची काही अडचण नाही.”

“पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा लोकसभेत दिसतील”

“लोकसभा निवडणुकीवर याचा परिणाम होणार नाही. लोकसभेची निवडणूक एक स्वतंत्र निवडणूक आहे. लोकसभा निवडणुकीत पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीच दिसतील याचा सर्वांना विश्वास आहे,” असं मत अमृता फडणवीसांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : Karnataka Election Results 2023 Live : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रियंका गांधींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “आता जनता…”

कर्नाटक पराभवावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

कर्नाटक पराभवावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कर्नाटकात कोणतेच सरकार परत येत नाही. एखादा दुसरा अपवाद सोडलं, तर ते बदलत असतं. यावेळी आम्ही कल तोडू शकेल, असं वाटतं होतं. पण, तसं झालं नाही. २०१८ साली भाजपाच्या १०६ जागा निवडून येत ३६ टक्के मत मिळाले होती. आता भाजपाला ३५.६ टक्के मते मिळाली आहेत. म्हणजे ०.४ टक्के मते भाजपाची कमी झाली आहेत. तसेच, ४० जागाही कमी झाल्या आहेत.”

“भाजपाची मते कुठेही कमी झालेली नाहीत”

“२०१८ साली काँग्रेसला ३८ टक्के, तर जेडीएसला १८ टक्के मते मिळाली होती. जेडीएसची ५ टक्के मते कमी झाली आहेत. ही मते काँग्रेसला मिळाली आहेत. त्यामुळे काँग्रेसला विजय झाला आहे. भाजपाची मते कुठेही कमी झालेली नाहीत,” असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.

“कर्नाटकाचे उदाहरण देऊन देश जिंकल्याचं सांगत आहेत, त्यात…”

“काही लोकांना असं वाटत आहे, जवळपास ते देशच जिंकले आहेत. त्यांना एवढाच सल्ला आहे, की पूर्वीचे विधानसभा आणि नंतर लोकसभेचे निकाल पाहिले पाहिजेत. आजच उत्तर प्रदेशच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल समोर आले आहेत. याठिकाणी भाजपाची एकहाती सत्ता आली आहे. त्यामुळे कर्नाटकाचे उदाहरण देऊन देश जिंकल्याचं सांगत आहेत, त्यात कोणताही अर्थ नाही,” असा टोला फडणवीसांनी विरोधकांना लगावला आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amruta fadnavis first reaction on bjp defeat in karnataka assembly election pbs
Show comments