लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज (ता. १३ मे) १० राज्यातील ९६ मतदारसंघात मतदान पार पडत आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये लोकसभा आणि विधासभेसाठी एकाचवेळी मतदान होत आहे. आंध्र प्रदेशच्या १७५ विधानसभा जागांसाठी आणि ओडिशाच्या २८ विधानसभा जागांवर मतदान प्रक्रिया पार पडत आहे. असे असतानाच आंध्र प्रदेशात एका आमदाराने मतदाराच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तेनाली विधानसभा मतदारसंघातील वायएसआर काँग्रेसचे आमदार अण्णाबथुनी शिवकुमार आणि एक मतदार यांच्यामध्ये मतदान केंद्रावरच तुफान हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. मतदान करण्यासाठी आमदार अण्णाबथुनी हे एका मतदाराला थप्पड मारताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर मतदारानेही प्रत्युत्तर देत आमदाराला थप्पड मारल्याचे दिसत आहे. यानंतर आमदारांच्या समर्थकांनी त्या व्यक्तीला मारहाण केली. मात्र, ही घटना घडत असताना त्या ठिकाणी पोलीस किंवा सुरक्षा रक्षक दिसून आले नाहीत. या घटनेमुळे या मतदार केंद्रावर काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

हेही वाचा : नाशिक दोऱ्यावेळी मुख्यमंत्र्यांकडील नऊ मोठ्या बॅगांमध्ये काय होतं? विरोधकांच्या आरोपांवर शिंदे गटाचं उत्तर, म्हणाले…

मतदान करण्यासाठी आमदार रांगेत न आल्यामुळे सदर व्यक्तीने आमदाराला अडवले होते. त्यातून आधी शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर हा वाद वाढला आणि या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले असल्याची प्राथमिक माहिती सांगितली जात आहे. या घटनेला दुसरे काही कारण आहे का? याबाबत अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही. मात्र, एका आमदाराने मतदारावर केलेल्या हल्ल्यामुळे सोशल मीडियावर टीका होत आहे. या दहा सेकंदाच्या व्हिडीओमध्ये पोलीस किंवा कोणीही सुरक्षा कर्मचारी यांनी मध्यस्थी करत हा वाद सोडवण्यासाठी आलेले दिसत नाहीत.

या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती सांगितली जात आहे. निवडणूक सुरू असताना एका आमदाराने मतदान केंद्रावर एका मतदाराला प्रकारे मारहाण केल्यामुळे अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशमध्ये लोकसभेच्या २५ आणि विधानसभेच्या १७५ जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. आंध्र प्रदेशमध्ये वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेस पक्षाला भाजप आणि चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील तेलगू देसम पक्षाच्या युतीचे आव्हान आहे. आंध्र प्रदेशमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Andhra pradesh assembly election in ysrcp mla a sivakumar slap voter marathi news gkt