आंध्र प्रदेशमध्ये लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणूकही झाली होती. या राज्यात विधानसभेच्या एकूण १७५ जागा असून प्रत्येक जागेसाठी भाजपा, वायएसआर काँग्रेस, काँग्रेस आणि तेलुगू देशम पार्टीत जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. या विधानसभा निवडणुकीचा निकालही लोकसभेच्या निकालाबरोबर जाहीर होणार असला तरी आज (२ जून) अनेक संस्थांनी आंध्र प्रदेश विधानसभेच्या निकालाबाबतचे एक्झिट पोल जाहीर केले. त्यानुसार राज्यातील सत्ताधारी वायएसआर काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसू शकतो. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची खुर्ची धोक्यात असल्याचे संकेत या एक्झिट पोल्समध्ये देण्यात आले आहेत. इंडिया टुडे आणि अ‍ॅक्सिस माय इंडियाने आंध्र प्रदेश विधानसभेबाबतचा एक्झिट पोल जाहीर केला असून यामध्ये एनडीएला बहुमत मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या एक्झिट पोलमध्ये राज्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) ९८ ते १२० जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींच्या वायएसआर काँग्रेसला ५५ ते ७७ जागा मिळतील असे संकेत देण्यात आले आहेत. एनडीएमधील भाजपाला आंध्र प्रदेशात ४ ते ६ जागा मिळू शकतात. तर चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देशम पार्टीला ७८ ते ९६ जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासह टॉलिवूड अभिनेता पवन कल्याण याच्या जन सेना पार्टीला १६ ते १८ जागा मिळू शकतात. भाजपा, टीडीपी आणि जेएसपी हे तीन पक्ष युतीत ही निवडणूक लढत आहेत. तर दुसऱ्या बाजूला आंध्र प्रदेशात काँग्रेसला ० ते २ जागांवर समधान मानावं लागू शकतं. राज्यात एनडीएची थेट वायएसआर काँग्रेसशी स्पर्धा आहे.

या एक्झिट पोलनुसार राज्यात वायएसआर काँग्रेसला ४४ टक्के मतं मिळतील, तर तेलुगू देशम पार्टीला ४२ टक्के मतं मिळतील. भाजपाला २, काँग्रेसला २ आणि जनसेना पार्टीला ७ टक्के मतं मिळू शकतात. आंध्र प्रदेशमधील शहरी भागात एनडीएचं वर्चस्व असून शहरी भागातून त्यांना ५३ टक्के मतदान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर ग्रामीण भागातून त्यांना ५० टक्के मतदान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तर वायएसएर काँग्रेसला शहरी भागात ४२ तर ग्रामीण भागात ४५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हे ही वाचा >> Lok Sabha Exit Poll : “बोलघेवडे नेते अन् तोतया पत्रकार…”, एक्झिट पोल्सवरून प्रशांत किशोरांचा संताप, रोख कोणाकडे?

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वाएसआर काँग्रेसने ‘न भूतो न भविष्यति’ अशी कामगिरी करत १७५ पैकी तब्बल १५१ जागा जिंकल्या होत्या. तर तेलुगू देशम पार्टीला २३ जागा मिळाल्या होत्या. पवन कल्याणच्या जनसेना पार्टीने एक जागा जिंकली होती. भाजपा आणि काँग्रेसला या राज्यात खातंही उघडता आलं नव्हतं.