२०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जवळपास हाती आले असून, याबरोबरच आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकालही लागला आहे. राज्यात भाजपा आणि एनडीएसाठी चांगली बातमी आहे. आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूक २०२४ चे निकाल टीडीपीच्या बाजूने लागताना दिसत आहेत. सर्व १७५ विधानसभा जागांवर कल आणि निकाल समोर येत आहेत. चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाने (TDP) जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाला (YSRCP) खूप मागे सोडले आहे. टीडीपी पक्षाने ८८ जागांची विजयी आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत आंध्र प्रदेशात सत्ता परिवर्तन निश्चित मानले जात आहे. आंध्र प्रदेशात विधानसभेच्या १७५ जागा आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी ८८ आमदारांची गरज आहे. राज्यात भाजपाने चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पार्टी (TDP) आणि अभिनेता पवन कल्याण यांच्या जनसेना पक्ष (JSP)बरोबर युती केली आहे. टीडीपीला १३५ हून अधिक जागांवर आघाडी असून, जेएनपीला २१ तर भाजपाला आठ जागांवर विजयी आघाडी मिळाली आहे. YSRCP ला फक्त ११ जागा जिंकता आलेल्या आहेत. तर काँग्रेससह अन्य पक्षांचे खातेही उघडले नाही. टीडीपीने ६३, जनसेना पक्षाने १३ तर भाजपने चार जागा जिंकल्या आहेत. तर वायएसआरसीपीने तीन जागा जिंकल्या आहेत.विशेष म्हणजे वायएस जगनमोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्याचे पत्र राज्यपालांना पाठवले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आंध्र प्रदेशात मुख्यमंत्री जगनमोहन यांचा पाठिंबा का कमी झाला?

आंध्र प्रदेशात विधानसभेच्या १७५ जागांसाठी चुरशीची लढत आहे. इकडे बहुमत मिळवण्यासाठी कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला ८८ जागा जिंकाव्या लागतात. एका बाजूला सीएम जगनमोहन रेड्डी आहेत, ज्यांच्या सरकारने ३० मे रोजी पाच वर्षे पूर्ण केली आहेत, तर दुसऱ्या बाजूला टीडीपी-भाजपा युती आहे, ज्यांनी ही निवडणूक जिंकली आहे. चंद्राबाबू नायडू यांचा टीडीपी, पवन कल्याणचा जनसेना पक्ष आणि भाजपाने राज्यात एकत्र निवडणूक लढवली आहे. एनडीएची थेट स्पर्धा जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआरसीपीशी होती.

हेही वाचाः Lok Sabha Election Result 2024 : भारताच्या इतिहासातला हा ऐतिहासिक विजय, नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया

निवडणुकीपूर्वी टीडीपी पुन्हा एनडीएमध्ये सामील झाला होता

निवडणुकीपूर्वी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलुगु देसम पक्षाचे (TDP) नेते चंद्राबाबू नायडू यांनी भाजपeच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) पुनरागमन केले होते. १९९६ मध्ये टीडीपी पहिल्यांदा एनडीएचा भाग झाला. चंद्राबाबू नायडू यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर काम केले होते. एवढेच नाही तर टीडीपीने आंध्र प्रदेशातील २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाही भाजपाबरोबर लढल्या होत्या, पण २०१९ मध्ये टीडीपी एनडीएपासून वेगळी झाली.

२०१९ मध्ये YSR काँग्रेस पक्षा (YSRCP) ने प्रचंड बहुमताने निवडणुका जिंकल्या होत्या, १७५ पैकी १५१ जागा जिंकल्या होत्या, तर विद्यमान तेलुगू देसम पार्टी (TDP) ने २३ जागा जिंकल्या होत्या. जनसेना पक्ष (JSP) ने एका जागेसह विधानसभेत प्रवेश केला, तर काँग्रेसला एक जागाही जिंकता आलेली नाही. त्यानंतर जगनमोहन रेड्डी यांना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री करण्यात आले. यावेळी चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली तेलुगू देसम, भाजपा आणि पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाची युती आहे. वाय. एस. शर्मिला यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा उदयास आलेल्या काँग्रेसने यावेळी डाव्या पक्षांशी हातमिळवणी केल्याने निवडणूक त्रिशंकू झाली आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Andhra pradesh tdp and bjp have a majority chief minister jaganmohan reddy resigned vrd