लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती येत असून, दक्षिण मध्य मुंबईतून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल देसाई विजयी झाले आहे. अनिल देसाई यांना ३,९५,१३८ मताधिक्क्य मिळालं असून, प्रतिस्पर्धी असलेल्या शिंदे गटाच्या राहुल शेवाळेंना ३, ४१, ७५४ मते मिळाली आहेत. अनिल देसाई यांचा ५३,३४८ मतांनी विजय झाला आहे. दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेनेचे राहुल शेवाळे निवडून येतील, अशी शक्यता राजकीय वर्तुळातून येत होती. परंतु अनिल देसाई यांनी त्याचा पराभव करत शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे.

https://x.com/ANI/status/1797932955605819849

विशेष म्हणजे तासाभरापूर्वी अनिल देसाई यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींकडे प्रतिक्रिया व्यक्त केली होती. अजून अधिकृत निकाल जाहीर झालेले नाहीत. एका तासाच चित्र स्पष्ट होईल. त्यानंतरच काही बोलणं योग्य ठरेल. लोकशाहीसाठी हा सर्वात मोठा धडा आहे. लोकशाहीत मजबूत असणं खूप गरजेचं आहे. इंडिया आघाडीसह महाविकास आघाडीचे सर्व नेते मग ते काँग्रेस, राष्ट्रवादी असो, समाजवादी पार्टीच्या नेतृत्वासह हा कार्यकर्त्यांचा विजय आहे, असंही ते म्हणाले होते.

शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांनी २०१९ मध्ये ही जागा दीड लाख मतांनी जिंकली होती. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला होता. २०१४ मध्येही शेवाळे यांनी गायकवाड यांचा पराभव केला होता. परंतु यंदा राहुल शेवाळे यांचा अनिल देसाई यांनी पराभव केला आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर मराठी मतदार हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जात होता. मराठी मते उद्धव ठाकरेंना मिळाल्याचं आता स्पष्ट झालं आहे. शेवाळे हे दलित समाजाचे प्रतिनिधित्व करतात, त्यामुळे त्यांना मराठी मते मिळण्याची आशा होती. परंतु अनिल देसाई यांना उद्धव ठाकरे यांच्या नावावर मते मिळाली असून, ते विजयी ठरले आहेत. निवडणुकीच्या प्रचारात उद्धव यांच्याप्रति लोकांची सहानुभूती दिसून आली. त्यामुळेच अनिल देसाई निवडून आल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.