PM Narendra Modi Oath Ceremony Updates, 9 June 2024: लोकसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या शपथविधीची जोरदार चर्चा पाहायला मिळत होती. मोदी सत्तेत आल्यापासून पहिल्यांदाच त्यांना सत्तास्थापनेसाठी मित्रपक्षांवर अवलंबून राहावं लागलं आहे. त्यामुळे या मंत्रीमंडळात मित्रपक्षांना सामावून घेण्याचं गणित मोदी कसं जुळवून आणतात? याची उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर आज मोदींच्या पंतप्रधान म्हणून तिसऱ्या टर्मला सुरुवात झाली. मात्र, गेल्या कार्यकाळात मोदींच्या मंत्रीमंडळात असणारे मंत्री अनुराग ठाकूर यांना या मंत्रीमंडळात स्थान मिळालेलं नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनुराग ठाकूर व राजीव चंद्रशेखर हे आधीच्या मंत्रीमंडळातील चेहरे नव्या मंत्रीमंडळातून बाहेर पडले आहेत. घटकपक्षांना सामावून घेण्याच्या दबावामुळेच मोदींना विद्यमान मंत्र्यांना मंत्रीमंडळातून बाहेर ठेवावं लागल्याचं बोललं जात आहे. त्यातील आघाडीचं नाव म्हणजे अनुराग ठाकूर. अनुराग ठाकूर यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात क्रीडा मंत्री, माहिती व प्रसारण मंत्री, अर्थ राज्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला आहे. करोनाच्या काळात केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून जारी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवेळी निर्मला सीतारमण यांच्यासमवेत अनुराग ठाकूरही पत्रकार परिषदांमधून लोकांपर्यंत पोहोचले होते.

“मोदी सरकार महत्त्वाचं आहे”

मंत्रीपदापेक्षाही मोदी सरकार महत्त्वाचं असल्याची प्रतिक्रिया अनुराग ठाकूर यांनी पीटीआयशी बोलताना दिली आहे. “मी पक्षासाठी एक कार्यकर्ता म्हणून याआधी काम केलं आहे आणि तसंच काम यापुढेही करत राहणार आहे. आमचे सगळे प्रयत्न हे भारताला विकासाच्या मार्गावर पुढे नेण्यासाठी आहेत. आम्ही सगळे एकत्र मार्गक्रमण करू. कारण भारत महत्त्वाचा आहे, मोदी सरकार महत्त्वाचं आहे आणि देशाचा विकास महत्त्वाचा आहे”, असं अनुराग ठाकूर म्हणाले.

एकही खासदार, आमदार नाही; तरीही आठवलेंना सलग तिसऱ्यांदा राज्यमंत्रीपद

“मी सगळ्यात आधी पक्षकार्यकर्ता आहे. हिमाचल प्रदेशमधल्या हमिरपूरच्या नागरिकांनी मला सलग पाचव्यांदा लोकसभेवर निवडून पाठवलं आहे. पाच वेळा लोकसभेवर निवडून जाणं हीच फार मोठी बाब आहे”, असंही अनुराग ठाकूर म्हणाले. केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी न लागल्यामुळे आता हिमाचल प्रदेशमध्ये मोठी जबाबदारी मिळणार का? या प्रश्नावर ते उत्तर देत होते.

“मोदींच्या मिशनसाठी काम करणार”

अनुराग ठाकूर यांनी इथून पुढे मोदींच्या मिशनसाठी काम करणार असल्याचं सांगितलं. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रीपदासाठी निवडलेले सर्व खासदार कार्यक्षम असून देशाला विकासाच्या मार्गावर पुढे नेण्यासाठी ते शक्य ते सर्व प्रयत्न करतील”, असंही अनुराग ठाकूर म्हणाले.

अनुराग ठाकूर यांच्याप्रमाणेच राजीव चंद्रशेखर यांचीही यंदाच्या मंत्रीमंडळात वर्णी लागलेली नाही. राजीव चंद्रशेखर यांचा केरळमघील तिरुअनंतपुरमचे विद्यमान खासदार शशी थरूर यांच्याकडून पराभव झाला. त्यानंतर एक्सवर सविस्तर पोस्ट टाकून राजीव चंद्रशेखर यांनी सलग १८ वर्षांच्या सार्वजनिक सेवेला पूर्णविराम लागल्याचं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anurag thakur not part of modi new cabinet in nda third term pmw