महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे. तसंच लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने कसं वातावरण आहे? यावरही उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी उत्तरं दिली आहेत. संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नाला उद्धव ठाकरेंनी दिलेलं उत्तर चर्चेत आहे. तुमचा अभिमन्यू झाला आहे का? या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी हे उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
“लोकशाहीचे धिंडवडे निघत आहेत. संविधान पाळलं जात नाही. पक्षांतर केल्यानंतर अपात्रतेची केस आहे. तिचाही निकाल अद्याप लागलेला नाही. वारंवार सर्वोच्च न्यायालयाने फटकारे मारले आहेत, खडे बोल सुनावले आहेत. तत्कालीन राज्यपाल म्हणून जे तिकडे बसले होते त्यांनाही सद्गृहस्थ म्हणायचं का? हा प्रश्न आहेच. सध्या जे महाभारत रंगलं आहे त्यात लोकशाहीचं वस्त्रहरण होतं आहे. महाभारतात द्रौपदीचं वस्त्रहरण झालं होतं तसाच हा प्रकार आहे. पक्ष कुणाचा हे लोकप्रतिनिधींवरुन ठरवू शकत नाही हे न्यायालयाने सांगितलं तरीही निर्णय झालेला नाही. सगळाच गोंधळ सुरु आहे.” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- “२०१२ पासून मोदींना शिवसेना फोडायची होती, पंतप्रधानपदासाठी त्यांनी..”, काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप
तुमचा अभिमन्यू झाला आहे का?
याच मुलाखतीत संजय राऊत यांनी प्रश्न विचारला की देशात महाभारताचा लढा हा धर्मासाठी झाला. महाभारतात दोन पात्रांवर नेहमीच चर्चा होते, ती म्हणजे अभिमन्यू आणि अर्जुन तुमचे विरोधक म्हणत आहेत तुमचा अभिमन्यू झाला आहे. हा प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले, “बरोबर आहे, पण अभिमन्यू शूर होता. तो भेकड नव्हता. आज हे जे काही ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयच्या माध्यमातून चक्रव्यूह टाकत आहेत. हे भेकड लोक आहेत. यांच्यात अभिमन्यूसारखं लढायचं धैर्य नाही. अभिमन्यू चक्रव्युहात घुसला होता. हे बाहेरच्या भाडोत्री लोकांना एकमेकांमध्ये लढवत आहेत. शिवसेना फोडली आणि शिवसेनेतच मारमाऱ्या लावण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला आणि कुटुंबात कलह निर्माण केला. पक्षांमध्ये भांडणं लावत आहेत. हे सगळं कौरवांनीही केलं होतं. आत्ता जे चाललं आहे ती कौरवनीतीच आहे. कौरवनीती शेवटी हरणार आहे. कौरव शंभर होते आणि पांडव पाचच होते, पण पाच पांडवांनी कौरवांवर मात केली. कारण पांडव हे सत्यासाठी आणि धर्माच्या बाजूने लढत होते. त्यामुळेच श्रीकृष्ण पांडवांच्या बाजूने उभा होता.”
मोदींनी महाराष्ट्राचा संताप अनुभवावा
मग हे युद्ध तुम्ही जिंकणार का? असं विचारलं असता नक्कीच असं उत्तर उद्धव ठाकरेंनी या मुलाखतीत दिलं आहे. तसंच लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही त्यांनी भाष्य केलं आहे. “मोदी सरकार होय मी मुद्दाम मोदी सरकारच म्हणतो आहे कारण मला आता मोदी सरकार नको आहे तर भारत सरकार हवं आहे. मोदी सध्या राज्यभरात फिरत आहेत, एखाद्या गल्लीबोळात रोड शो देखील करतील, त्यांनी तो करावा. महाराष्ट्र कसा आहे? महाराष्ट्राचा आक्रोश कसा आहे हे मोदींनी अनुभवलं पाहिजे. मोदी सरकारच्या थापाही उघड झाल्या आहेत. मी भाषणांमधले मुद्दे यात मांडणार नाही पण हे सरकार म्हणजे गजनी सरकार झालं आहे.