लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ६० पैकी ४६ जागांवर विजय मिळवला आहे. भाजपाच्या या विजयासह अरुणाचल प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री पेमा खांडू पुन्हा एकदा या पदावर विराजमान होणार आहेत. दुसऱ्या बाजूला सिक्कीम विधानसभेचा निकाल जाहीर झाला असून भाजपा या राज्यात खातंदेखील उघडू शकलेली नाही. सिक्कीममध्ये सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) या सत्ताधारी पक्षाने राज्यातील ३२ पैकी ३१ जागा जिंकल्या आहेत. तर एका जागेवर सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटचा उमेदवार विजयी झाला आहे.

अरुणाचल प्रदेशमध्ये ६० विधानसभा जागांसाठी १९ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. येथे ८२.९५ टक्के मतदान झालं होतं. राज्यात भाजपाचा सुरुवातीलाच १० जागांवर बिनविरोध विजय झाला होता. दरम्यान, मतमोजणीनंतर निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार भाजपाच्या पारड्यात ४६ जागा पडल्या आहेत. या राज्यात बहुमतासाठी ३१ जागा गरजेच्या आहेत. त्यामुळे अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपा एकहाती सत्ता स्थापन करणार आहे.

यासह अरुणाचल प्रदेशमध्ये नॅशनल पीपल्स पार्टीने (एनपीईपी) पाच जागा जिंकल्या आहेत. पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल (पीपीए) ने दोन जागांवर विजय मिळवला आहे. त्याचबरोबर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (एनसीपी) राज्यात तीन जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे. तसेच राज्यातील एकूण तीन जागांवर अपक्ष उमेदवार जिंकले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही प्रामुख्याने महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय असली तरी अरुणाचल प्रदेश, लक्षद्वीपमध्येही या पक्षाच्या नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अरुणाचल प्रदेशमधील पक्षाचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते अजित पवारांच्या गटात सहभागी झाले. अजित पवारांच्या गटातील उमेदवारांनी ही निवडणूक घड्याळ या चिन्हावर लढवली होती. यामध्ये अजित पवारांचे तीन शिलेदार विजयी झाले आहेत.

हे ही वाचा >> Exit Poll : अमेठी, रायबरेलीत कोण जिंकणार? राहुल गांधी, स्मृती इराणींच्या मतदारसंघात काय घडणार?

राज्यातील तिसरा मोठा पक्ष

याचुली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे टोको तातुंग हे ८,२५५ मतांसह विजयी झाले आहेत. लेकांग मतदारसघांत लिखा सोनी हे ७,८०४ मतांसह आणि बर्दुम्सा-दायुनमधून निख कामीन हे १०,४९७ मतांसह विजयी झाले आहेत. या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकूण मतांपैकी १०.०६ टक्के मतं मिळाली आहेत. मतांच्या टक्केवारीचा विचार करता हा राज्यातील तिसरा मोठा पक्ष आहे.