अवघ्या दोन दिवसांमध्ये पंजाबमध्ये विधानभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. २० फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात संपूर्ण पंजाबमध्ये मतदान होणार आहे. त्यामुळे गुरुवारी पंजाबमधील प्रचार शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळालं. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर खलिस्तानी संघटनांशी लागेबांधे असल्याचा आरोप काँग्रेस, भाजपाकडून करण्यात येत असताना आता अरविंद केजरीवाल यांनी या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, या सर्व विरोधी पक्षांना खोचक टोला देखील लगावला आहे.
“जर मी दहशतवादी असेन, तर…”
पंजाबमधील फुटीरतावाद्यांशी लागेबांधे असल्याच्या आरोपावर बोलताना अरविंद केजरीवालांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. “ते म्हणतात, गेल्या १० वर्षांपासून अरविंद केजरीवाल देशाला दोन भागांमध्ये विभागण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यातल्या एका भागाचं मला पंतप्रधान व्हायचं आहे. हा एक विनोद आहे. हे हास्यास्पद आहे”, असं केजरीवाल म्हणाले. “जणूकाही मी फार मोठा दहशतवादी आहे. मग त्यांच्या सुरक्षा यंत्रणा काय करत होत्या? काँग्रेस देखील १० वर्ष सत्तेत होती. ते काय झोपले होते का? मोदींनीही मला अटक का केली नाही?” असा सवाल देखील केजरीवाल यांनी केला आहे.
“मी कदाचित सर्वात चांगला दहशतवादी”
“मी कदाचित सर्वाच चांगला दहशतवादी असेन, जो आत्तापर्यंत लोकांसाठी रुग्णालयं आणि शाळा बांधतोय”, असा टोला देखील केजरीवाल यांनी लगावला.
“सगळे सारखंच बोलतायत”
यावेळी बोलताना अरविंद केजरीवाल यांनी सगळेच पक्ष भ्रष्टाचारी असल्याचा दावा केला. “अकाली दल, काँग्रेस एकत्र आले आहेत. सगळेच पक्ष भ्रष्टाचारी आहेत. प्रियांका गांधी, सुखबिर बादल, चरणजीतसिंग चन्नी, कॅप्टन अमरिंदर सिंग हे आम आदमी पक्षाला पराभूत करण्यासाठी एकत्र आले आहेत. भगवंत मान हे एक प्रामाणिक नेते आहेत”, असं केजरीवाल म्हणाले.
“ते सगळे एकच भाषा बोलत आहेत. असं वाटतंय की ते दररोज रात्री व्हिडीओ कॉल किंवा कॉन्फरन्स कॉलवर एकमेकांशी चर्चा करतात”, असा खोचक टोला देखील केजरीवाल यांनी यावेळी लगावला.