जवळपास दोन महिने तिहार तुरुंगात काढल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला आहे. तुरुंगातून बाहेर पडल्यावर केजरीवाल लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल दिल्ली, पंजाबसह देशभर पक्षाचा आणि इंडिया आघाडीचा प्रचार करत आहेत. दरम्यान, केजरीवाल आज (१७ मे) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांनी भिवंडीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार गट) लोकसभेचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्यामामा पाटील यांच्या प्रचारार्थ पक्षाने आयोजित केलेल्या सभेला संबोधित केलं. यावेळी केजरीवाल यांनी तुरुंगातील दिवस आठवले. केजरीवाल म्हणाले, “या लोकांनी (सत्ताधारी भाजपा) मला तुरुंगात खूप त्रास दिला.”
अरविंद केजरीवाल म्हणाले, “माझी शोकांतिका बघा… मी दिल्लीत मुख्यमंत्री म्हणून रुजू झाल्यापासून लोकांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या. आरोग्यविषयक योजनेंतर्गत मी लोकांची औषधं मोफत केली. आजार लहान असो अथवा मोठा, सर्व प्रकारच्या आजारांवरील औषधं मी मोफत केली. आजही तुम्ही दिल्लीत गेलात तर तुम्हाला मोफत औषधं मिळतील. परंतु, मी तुरुंगात गेल्यावर सुरुवातीचे १५ दिवस माझी औषधं मात्र बंद करण्यात आली होती. मी उच्च मधुमेहाचा (हाय डायबिटीज) रुग्ण आहे. मला हाय शुगरचा त्रास असल्यामुळे गेल्या वीस वर्षांपासून मी औषधं आणि इन्सुलिनवर तग धरून आहे. मला दिवसातून इन्सुलिनची चार इंजेक्शनं द्यावी लागतात. मला दररोज ५२ युनिट इन्सुलिन घ्यावं लागतं. परंतु, तुरुंगात गेल्यावर पहिले १५ दिवस मला इन्सुलिन दिलं गेलं नाही. मला कुठल्याही प्रकारची औषधं दिली गेली नाहीत. माझी साखर ३०० ते ३५० च्या पुढे गेली होती. मी औषधांची आणि इन्सुलिनची मागणी करत होतो, परंतु मला माझी औषधं आणि इन्सुलिन दिलं नाही.”
दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले, एखाद्या रुग्णाची साखर खूप दिवस अशी वाढलेली राहिली तर त्याची किडनी आणि लिव्हर (मुत्रपिंड आणि यकृत) खराब होतं. परंतु. मला माहिती नाही हे लोक माझ्याबरोबर असं का वागत होते. मला हे देखील माहिती नाही की हे लोक माझ्याबरोबर काय करणार होते. इतिहासात आपण असे अनेक नेते पाहिले आहेत ज्यांनी त्यांच्या विरोधकांना तुरुंगात डांबून मारून टाकलंय. हे लोक माझ्याबरोबर तसं काही करणार होते का हे मला माहिती नाही.
हे ही वाचा >> “उद्धव ठाकरे म्हणाले, मी यू टर्न घेतोय, शिवसैनिकांसमोर आमची आब्रू…”, फडणवीसांनी सांगितला ‘मातोश्री’वरील घटनाक्रम
केजरीवाल म्हणाले, या लोकांनी मला तुरुंगात टाकलं, कारण मी दिल्लीकरांची वीज मोफत केली. मी गरिबांसाठी शाळा काढल्या, मोहल्ला क्लिनिक सुरू केलं. परंतु, त्यांनी माझ्यासारखं काम करण्याऐवजी मला तुरुंगात टाकलं. नरेंद्र मोदी खरंच जर इतके मोठे नेते आहेत, तर त्यांनीदेखील माझ्याप्रमाणे दिल्लीत आणि पंजाबमध्ये वीज मोफत करायला हवी होती. त्यांनी तसं केलं असतं तर त्याला आपण मोदींचा मोठेपणा म्हटलं असतं. परंतु, त्यांनी मलाच तुरुंगात टाकून दिल्लीकरांची मोफत वीज बंद करण्याचा प्रयत्न केला. कारण भाजपाची आणि मोदींची मानसिकता इतकी छोटी आहे.