आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये मोठा विजय मिळवून दिल्लीपाठोपाठ पंजाबही ताब्यात घेतलं आहे. पंजाबमध्ये काँग्रेसच्या पराभवानंतर पक्षाचे नेते राघव चढ्ढा म्हणाले की, आप आता राष्ट्रीय पक्ष बनला आहे आणि लवकरच देशातला सर्वात मोठा विरोधक म्हणून काँग्रेसची जागा घेईल.
राघव चढ्ढा यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले की, “आम आदमी पक्षाला राष्ट्रीय शक्ती बनताना मी पाहत आहे. आप काँग्रेसची राष्ट्रीय स्तरावरची जागा घेणार आहे. ‘आप’साठी पक्ष म्हणून हा एक मोठा दिवस आहे, कारण आज आपण एक राष्ट्रीय पक्ष बनलो आहोत. आता आम्ही प्रादेशिक पक्ष राहिलेलो नाही. देवाच्य आशीर्वादाने एक दिवस अरविंद केजरीवाल पंतप्रधान होतील आणि देशाचं नेतृत्व करतील.
“पंजाबच्या जनतेने केजरीवालांच्या कारभाराचे मॉडेल पाहिले आहे आणि त्यांना ते आजमावून पहायचे आहे. ज्यांनी पाच दशकांपासून पंजाबच्या लोकांना त्यांच्या हक्काच्या सोयीसुविधांशिवाय ठेवले होते आणि ज्यांना आपण कायमचे राज्य करू असे वाटले होते ते आता बाहेर फेकले गेले आहेत. . लोकांनी त्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला,” असंही चड्ढा पुढे म्हणाले. चड्ढा यांनी आपचं प्रचारगीत “इक मौका केजरीवाल नु (केजरीवाल यांना संधी द्या)” हे गायलं आहे.