कर्नाटक विधानसभा निवडणूक १० मे रोजी पार पडते आहे. या विधानसभा निवडणुकीत बजरंग दलाचा मुद्दा पुढे आला आहे. या दलावर बंदी घालण्याची मागणी केली जाते आहे. तर भाजपाने याला विरोध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जय बजरंग बली अशी घोषणा द्या आणि मग मतदान करा असं आवाहन केलं आहे. एवढंच नाही तर बेल्लारी या ठिकाणी झालेल्या एका प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द केरला स्टोरी सिनेमाचा उल्लेख करत काँग्रेसवर टीका केली होती. त्यावर आता AIMIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी मोदींवर पलटवार केला आहे.
असदुद्दीन ओवैसींनी काय म्हटलं आहे?
मणिपूर जळतं आहे. तिथली गावं, तिथे असलेल्या चर्चेसना आग लावली जाते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र घाणेरड्या केरला स्टोरी सिनेमाचं नाव घेत आहेत. हा एक बटबटीत सिनेमा आहे. त्याच्या आडून मोदी बोलत आहेत आणि निवडणुकीत फायदा करुन घेऊ इच्छित आहेत. एकीकडे मोदी सिनेमावर बोलत आहेत आणि दुसरीकडे पाकिस्तान आपल्या सैनिकांना ठार करतो आहे. द केरला स्टोरी हा सिनेमा खोट्या तथ्यांवर आधारीत आहे. आमचा बुरखा दाखवून हे लोक फक्त पैसे कमावू इच्छितात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिरस्कार पसरवत आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इतकी खालची पातळी गाठली आहे. तुम्ही फक्त भाषण करू नका आपले सैनिक मारणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवा असंही ओवैसींनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय वक्तव्य केलं होतं?
कर्नाटकच्या बेल्लारी या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रचारसभा होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, दहशतवादी कट असलेल्या एका कथानकावर आधारित चित्रपट ‘केरला स्टोरी’ सध्या खूप चर्चेत आहे. हा चित्रपट केवळ एका राज्यातल्या दहशतवादी कटांवर आधारित आहे. केरळ हे देशातलं खूप सुंदर राज्य आहे. केरळमधले लोक खूप परिश्रमी आणि प्रतिभावान असतत. परंतु त्याच केरळमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी कटाचा खुलासा या चित्रपटाने केला आहे.
पंतप्रधान म्हणाले, बॉम्ब-बंदूक आणि पिस्तूलाचा आवाज ऐकू येतो. परंतु समाजाला आतून पोखरण्याचा आवाज येत नाही. कोर्टानेही आतंकवादाच्या या स्वरुपाबाबत चिंता व्यक्त केल्या आहेत. परंतु आपल्या देशाचं दुर्भाग्य बघा. आपल्या समाजाला उद्ध्वस्त करणाऱ्या या दहशतवादी प्रवृत्तीच्या पाठीशी काँग्रेस उभी आहे. यानंतर आता पंतप्रधान मोदींना ओवैसींनी उत्तर दिलं आहे.