देशात नुकत्याच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडलं. त्यापाठोपाठ रविवारी (३ डिसेंबर) सकाळपासून चार राज्यांच्या निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले आहेत. दुपारी १ वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालानुसार चारपैकी तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी आघाडीवर आहे. तर तेलंगणात काँग्रेसने बीआरएसला धोबीपछाड दिला आहे. मध्य प्रदेशात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. तर राजस्थानातही भाजपाने मोठी आघाडी घेतली आहे. छत्तीसगडमध्ये भाजपा काँग्रेसमध्ये चुरस असली तरी भाजपा सध्या पुढे आहे. ही तिन्ही राज्ये भाजपाकडे जात असल्याचं चित्र आता स्पष्ट होऊ लागलं आहे. त्यामुळे देशभरातील भारतीय जनता पार्टीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. महाराष्ट्र भाजपातही आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
तीन राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव होताना दिसत आहे. त्यामुळे भाजपा नेत्यांनी काँग्रेसवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. तसेच इंडिया आघाडीतल्या इतर पक्षांवरही हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र भाजपाने काँग्रेससह शिवसेनेचा ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटावर निशाणा साधला आहे. भाजपाचे माजी आमदार आशिष शेलार यांनी तीन राज्यांमधील निवडणुकीच्या निकालावरून काँग्रेस आणि ठाकरे गटाला टोला लगावला आहे. त्याचबरोबर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस खासदार राहुल गांधींवर टीका केली आहे.
हे ही वाचा >> Telangana : अभाविप, टीडीपी ते काँग्रेस; कधी काळी तुरुंगात गेलेले रेवंत रेड्डी मुख्यमंत्रीपदाचे दावेदार?
आशिष शेलार यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यात शेलार यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्राच्या गल्लीत उभं राहून रोज एक नेता सांगत असतो, होय मी मर्द आहे! त्यांचे बिनकामाचे सरदार पत्रकार पोपटलाल म्हणतात, देशाला पुरुष हवाय! अरे तुम्हाला मीडियाचे चार कॅमेरे सोडले तर या देशात विचारतंय कोण? तुम्हाला आज कळलं का? मर्द कोण आणि मर्दानकी काय असते ती! आज देशाने काँग्रेसच्या युवराजांना पण दाखवून दिलंय, पनौती कोण आणि चुनौती कोण! महाराष्ट्रातील पंचायत ते राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडच्या विधानसभा आणि लवकरच होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत फक्त मोदी, मोदी आणि मोदी!