Vidhan Sabha Election Results 2023 Date Time : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोरम या पाच राज्यांत गेल्या दोन महिन्यांत निवडणुकांचा धुराळा उडाला. आरोप प्रत्यारोप झाले. आश्वासांची खैरात केली गेली. महाराष्ट्रातील अनेक नेते या राज्यांमध्ये प्रचारासाठी गेले होते. एवढचं नव्हे तर आगामी लोकसभा निवडणुकांची ही रंगीत तालिम असल्याचंही म्हटलं जातंय. दरम्यान, ३० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून आता उद्या (३ डिसेंबर) मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांची मतमोजणी रविवार, ३ डिसेंबर रोजी होणार असून मिझोरामची मतमोजणी सोमवारी ४ नोव्हेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, या चार राज्यांत होत असलेली मतमोजणी कुठे पाहाल, कधी पाहाल याची सविस्तर माहिती देत आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मतदान प्रक्रिया पार पडलेल्या पाचही राज्यांत अटीतटीची लढत झाली. पाचही राज्यांमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी थेट लढत आहे. राजस्थानमध्ये आतापर्यंत एकच सरकार सलग १० वर्षं राहिलेलं नाही. त्यामुळे भाजपाला यंदा राजस्थानमध्ये आशा असताना दुसरीकडे मध्य प्रदेशमध्ये २०२०मध्ये सत्तानाट्यात सत्ता गमावल्यानंतर काँग्रेस पुन्हा सत्तारूढ होण्यासाठी उत्सुक आहे. छत्तीसगडमध्ये बघेल सरकारनं ग्रामीण भागात, विशेषत: आदिवासी व शेतकरी समाजासाठी केलेल्या कामांचा काँग्रेसला फायदा होणार का? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तिकडे तेलंगणामध्ये बीआरएसच्या नव्या मॉडेलला जनता पुन्हा कौल देईल की काँग्रेस मुसंडी मारेल, याकडेही राजकीय जाणकारांचं लक्ष राहील. दरम्यान, निकाल कुठे पाहाल याआधी आपण कोणत्या राज्यात किती मतदान झालं, किती जागांसाठी मतदान झालं हे पाहुयात.

कोणत्या राज्यात किती मतदान झालं?

छत्तीसगड येथे ९० जागांसाठी मतदान झाले. २०१८ मध्ये या राज्यात ७६.४५ टक्के मतदान झालं होतं. परंतु यंदा ७६.३१ टक्क्यांवर हे मतदान घसरलं. छत्तीसगड राज्याची निर्मिती २००० मध्ये झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत पाच निवडणुका येथे झाल्या. यापैकी २०१३ मध्ये झालेल्या निवडणुकीत ७७.१२ टक्क्यांनी सर्वाधिक मतदान झालं होतं.

हेही वाचा >> Chhattisgarh Election Result 2023 Live: काँग्रेस की भाजपा? कोण मारणार बाजी? छत्तीसगड विधानसभा निवडणुकीचा निकाल एका क्लिकवर

मध्य प्रदेशमध्ये २३० जागांसाठी निवडणूक झाली. यावेळी आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे ७६.२२ टक्के मतदान झालं. २०१८ मध्ये ७४.९७ टक्के मतदान झालं होतं, त्यावेळी काँग्रेसची सत्ता स्थापन झाली होती. परंतु, वर्षभरानंतर येथे भाजपाने सत्ता स्थापन केली.

हेही वाचा >> Madhya Pradesh Election Result 2023 Live : मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक निकालाच्या लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर…

राजस्थानमध्ये २०० जागांसाठी निवडणूक झाली असून ७४.९६ टक्के मतदान झालं. २०१८ च्या तुलनेत यंदा येथे मतदान वाढलेलं दिसलं. त्यामुळे राजस्थानमध्ये कोणाची सत्ता स्थापन होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. या ठिकाणी एक्झिट पोलनुसार भाजपाला संधी मिळणार असल्याचं म्हटलं जातंय.

हेही वाचा >>Rajasthan Election Result 2023 Live: काँग्रेस सत्ता राखणार की भाजपा वरचढ ठरणार? राजस्थानचा आज फैसला!

तेलंगणात ११९ जागांसाठी निवडणूक झाली. येथे ७१.३४ टक्के मतदान झालं. २०१८ च्या तुलनेत येथे यंदा कमी मतदान झालं. काँग्रेस, बीआरएस आणि भाजप अशी तिहेरी लढत येथे प्रामुख्याने पाहायला मिळाली. तसंच, एएमआयएमनेही येथे चांगली मुसंडी मारली होती. त्यामुळे येथे पक्षांतर होतंय की बीआरएसचं सत्ता स्थापन करतंय याकडे सर्वांचं लक्ष आहे.

हेही वाचा >> देशकाल: तेलंगणात वारा की वादळ?

मतमोजणी किती वाजता सुरू होईल?

मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू होईल. राज्यातील विविध मतदारसंघात मतमोजणी केंद्रावर मतमोजणी केली जाईल. ज्याप्रमाणे अधिकृत निकाल येतील, त्याप्रमाणे आकडेवारी जाहीर केली जाईल.

निवडणूक निकाल कुठे पाहाल?

सर्वच राज्यांमध्ये ७० टक्क्यांहून अधिक मतदान झालं आहे. त्यामुळे मतदारांनाही निकालाची उत्सुकता आहे. या निकालाची अधिकृत माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असते. या संकेतस्थळावरील अहवालावरून लोकसत्ता.डॉट कॉमवरही आणि लोकसत्ता अॅपवरही निकालाची आकडेवारी उपलब्ध केली जाणार आहे. तसंच, लोकसत्ताच्या सर्व अधिकृत सोशल मीडिया खात्यावरूनही आकडेवारी दिली जाईल.

विधानसभा निवडणुकांचे निकाल आल्यानंतर वाचा विश्लेषणात्मक लेख

पाचही राज्यात वादळी निवडणूक झाली आहे. प्रत्येक राज्यातील राजकीय वातारण, तेथील पक्षीय बलाबल, पक्षांचं अंतर्गत राजकारण वेगवेगळं आहे. यासंदर्भातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी आणि विश्लेषणात्मक लेख तुम्ही लोकसत्ताच्या संकेतस्थळावर आणि अॅपवर विनामुल्य वाचू शकणार आहात.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडचे लाईव्ह निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा…

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assembly 5 states election results 2023 date time when where and how to watch in marathi sgk