केंद्रीय निवडणूक आयोगाने मिझोरामच्या मतमोजणीच्या तारखेत बदल केला आहे. याआधीच्या निवडणूक कार्यक्रमानुसार ३ डिसेंबर रोजी मिझोराममध्ये मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार होती. परंतु, आता ४ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने याबाबत प्रसिद्धी पत्रक जारी करत ही माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिझोराममध्ये ख्रिश्चन समुदाय बहुसंख्य आहे. या समुदायासाठी रविवाचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे, ३ तारखेला होणारी मतमोजणी पुढे ढकलावी अशी सातत्याने मागणी विविध स्तरांतून केली जात होती. या मागणीचा सकारात्मक विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या निवेदनांचा विचार करून मिझोराम विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीच्या तारखेत बदल करून ४ डिसेंबर २०२३ (सोमवार) रोजी मतमोजणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर, उर्वरित राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील मतमोजणी ठरल्या तारखेला होणार असल्याचंही निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.

ईशान्येकडील मिझोराम राज्यात सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट पुन्हा सत्ता कायम राखणार की राज्यात सत्ताबदल होणार याची उत्सुकता आहे. मिझो शांतता करार झाल्यापासून राज्यात काँग्रेस आणि मिझो नॅशनल फ्रंट या दोन पक्षांमध्ये लढत होते. या दोन्ही पक्षांना लागोपाठ दोनदा सत्ता मिळालेली असल्याने यंदा मिझो नॅशनल फ्रंट बाजी मारेल, असा अंदाज वर्तविला जातो.

हेही वाचा >> मिझोराममध्ये सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट सत्ता कायम राखणार का?

एक्झिट पोलचा अंदाज काय?

मिझोराममध्ये ७ नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. तर, इतर चार राज्यांत ३० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण होताच सायंकाळी विविध संस्थांचे एक्झिट पोलही जाहीर झाले. इंडिया टीव्ही-सीएनएक्सने केलेल्या सर्वेक्षणानुसार मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंट (MNF) – १४ ते १८ जागा, झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) – १२ ते १६ जागा, काँग्रेस – ८ ते १० जागा, भाजपा – ० ते २ जागा असा अंदाज व्यक्त केला आहे. तर, एबीपी न्यूज – सी वोटरच्या सर्वेक्षणानुसार, मिझो नॅशनल फ्रंट (MNF) – १५ ते २१ जागा, झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) – १२ ते १८ जागा, काँग्रेस – २ ते ८ जागा, भाजपा – ० जागा मिळतील, असा अंदाज आहे. तसंच, जन की बातच्या एक्झिट पोलनुसार मिझो नॅशनल फ्रंट (MNF) – १० ते १४ जागा, झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) – १५ ते २५ जागा, काँग्रेस – ५ ते ९ जागा, भाजपा – ० ते २ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assembly elections 2023 ec changes counting date for mizoram to december 4 sgk