देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या पाच राज्यातील निवडणुका ५ ते ३० नोव्हेंबर दरम्यान होणार आहेत. तर, ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. लोकसभा २०२४ साठी एनडीए आणि इंडिया आघाडी एकमेकांविरोधात धडकल्याने घोषित केलेली विधानसभा निवडणूक चुरशीची ठरणार आहे. दरम्यान, एबीपी न्युज आणि सी व्होटरने केलेला सर्व्हे समोर आला आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने चांगल्या मताधिक्क्याने भाजपाला चितपट केलं होतं. त्यामुळे इतर राज्याही काँग्रेसचा वरचष्मा दिसणार असल्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या सर्वेनुसार, पाच पैकी तीन राज्यांत काँग्रेसला दणदणीत यश मिळणार असून काँग्रेस भाजपाला कडवी झुंज देणार आहे.
हेही वाचा >> Assembly Election Dates 2023: निवडणूक आयोगाची मोठी घोषणा, मध्य प्रदेशासह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर
मिझोराममध्ये काय होणार?
ABP-CVoter च्या ओपिनियन पोलनुसार, मिझोराममध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही. मिझोराममध्ये विधानसभेच्या अवघ्या ४० जागा असून सत्ताधारी MNF (Mizo National Front) सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येण्याची शक्यता आहे. तर, त्यापाठोपाठ काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर विजयी होऊ शकतो.
अंदाजित जागा – MNF- १३ ते १७ जागा, INC – १०-१४ जागा, ZPM – ९ ते १३ आणि इतर १-३ जागा मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >> विश्लेषण: Exit Poll म्हणजे काय? त्याचा अंदाज कसा व्यक्त केला जातो? ओपिनियन पोल कशाला म्हणतात?
तेलंगणात बीआरएस आणि काँग्रेसमध्ये स्पर्धा
ओपिनियन पोलच्या आधारे तेलंगणात सध्या सत्ताधारी बीआरएस पक्ष आणि काँग्रेस यांच्यात तीव्र स्पर्धा होणार आहे. येथे विधानसभेच्या ११९ जागा असून बीआरएसला ४३ ते ५५ जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर काँग्रेसला ४८ ते ६० जागा मिळतील असा अंदाज आहे. तर, येथे भाजपाला ५ ते ११ जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. ABP-CVoter पोलनुसार, काँग्रेसला अंदाजे ३९ टक्के मते मिळतील. म्हणजेच, मागच्या वेळेपेक्षा १०.५ टक्के मते जास्त मिळणार आहेत. याउलट, सत्ताधारी BRS ला ९.४ टक्के मते कमी मिळण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, भाजपाला १६ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे, मागच्या मतदानापेक्षा यंदा भाजपाला ९.३ टक्के मतवाढ अपेक्षित आहे.
अंदाजित जागा – INC: ४८ ते ६०, भाजपा ५ ते ११, बीआरएस ४३ ते ५५, इतर ५ ते ११ जागा मिळण्याची शक्यता आहे.
छत्तीसगडमध्ये भाजपा आणि काँग्रेसमध्ये कडवी झुंज
छत्तीसगडमध्ये भाजपा आणि काँग्रेस यांच्यात अटीतटीची लढत होणार आहे. अंदाजानुसार, काँग्रेसला येथे ४५ टक्के मते मिळणार आहेत. तर, भाजपाला ४४ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. येथे विधानसभेच्या ९० जागा असून बहुमतासाठी काँग्रेस आणि भाजपा यांच्यात कडवी झुंज होणार आहे, असं सर्वेक्षणातून दिसणार आहे.
अंदाजित जागा – INC – ४५ ते ५१, भाजपा ३९ ते ४५ आणि इतर ०-२ जागांचा अंदाज आहे.
मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला बहुमत
मध्य प्रदेशात सत्ताबदल होणार असल्याचं चित्र या सर्वेनुसार स्पष्ट होत आहे. काँग्रेसला येथे सत्ता स्थापन करण्यास चांगला वाव मिळू शकतो. कारण, काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना प्रत्येकी ४५ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. येथे २३० जागा असून काँग्रेसला ११३ ते १२५ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, भाजपाला १०४ ते ११६ जागा मिळतील. म्हणजे, बहुमतासाठी ११६ चा आकडा काँग्रेस सहज पार करू शकेल, असं सर्वेक्षणातून समोर आलं आहे.
अंदाजित जागा
काँग्रेस ११३-१२५
भाजपा १०४-११६
इतर – ० ते ४ जागा
राजस्थानमध्ये भाजपाच सत्ताधारी
राजस्थानमध्ये भाजपाला मोठा विजय मिळण्याची शक्यता आहे. २०० जागांपैकी १२७ ते १३७ जागा भाजपाला मिळण्याची शक्यता आहे. तर, काँग्रेसला ५९ ते ६९ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
अंदाजित जागा
काँग्रेस – ५९ ते ६९
भाजपा – १२७ ते १३७
इतर – २ ते ६