अनुच्छेद ३७० बाबत गेल्या वर्षी निकाल देतानाच सर्वोच्च न्यायालयाने जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुका ३० सप्टेंबर २०२४ अगोदर घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाने आज जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. मुख्य निवडणूक आयुक्तांनी प्रदेशाचा दौरा करुन विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर ही निवडणूक जाहीर करण्यात आली.
जम्मू काश्मीर प्रदेशात अनुच्छेद ३७० रद्द केल्यावर भौगोलिक, राजकीय परिस्थितीत बदल झाला आहे. हा बदल इतकाच मर्यादित नसून अतिरेक्यांनी आपल्या रणनीतीत केलेला बदल दुर्लक्षित करता येणारा नाही. प्रकाशित माहितीनुसार प्रदेशातील परिस्थितीबाबत अनेक धक्कादायक बाबी उघड होताहेत. वाढत्या हिंसक वातावरणार प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका घेणे हे एक मोठे आव्हान असणार आहे.
२०१४ सालापासून जम्मू काश्मीर प्रदेशात झालेले अतिरेकी हल्ले आणि जीवितहानीची आकडेवारी उपलब्ध आहे. ३७१ नागरिक आणि ६१३ सुरक्षासैनिकांचा गेलेला बळी काश्मीर खोऱ्यातील भयाण वास्तव समोर आणणारी ही आकडेवारी आहे. १७८७ अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यासाठी ९८४ निष्पाप जीवांचा बळी जाणे निश्चितच दुर्दैवी म्हणावे लागेल. प्रत्येक दोन अतिरेक्यांच्या मागे एका निष्पापाच्या बळी जाण्याचे हे प्रमाण धक्कादायक आहे. २०२४ सालचा विचार केल्यास पहिल्या सात महिन्यात २८ नागरीक आणि सैनिकांना हौतात्म्य आले असून २४ अतिरेकी मारले गेले आहेत. घुसखोरी थांबवण्यात आपण कुठेतरी कमी पडतो आहोत, हे वास्तव मान्य करावेच लागेल. एकीकडे पाकव्याप्त काश्मीर घेण्याच्या वल्गना करताना वास्तविकतेचे भान ठेवणे गरजेचे आहे.
कसा असेल जम्मू काश्मीरमधील निवडणूक कार्यक्रम
जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. १८ सप्टेंबरला पहिला टप्पा, २५ सप्टेंबरला दुसरा टप्पा, तर १ ऑक्टोबरला तिसरा टप्पा होणार आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम | टप्पा १ | टप्पा २ | टप्पा ३ |
अधिसूचना निघणार | २० ऑगस्ट २०२४ | २९ ऑगस्ट २०२४ | ५ सप्टेंबर २०२४ |
उमेदवार अर्ज भरण्याची अंतिम मुदत | २७ ऑगस्ट २०२४ | ५ सप्टेंबर २०२४ | १२ सप्टेंबर २०२४ |
नामनिर्देशनपत्रांची छाननी | २८ ऑगस्ट २०२४ | ६ सप्टेंबर २०२४ | १३ सप्टेंबर २०२४ |
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत | ३० ऑगस्ट २०२४ | ९ सप्टेंबर २०२४ | १७ सप्टेंबर २०२४ |
मतदान | १८ सप्टेंबर २०२४ | २५ सप्टेंबर २०२४ | १ ऑक्टोबर २०२४ |
मतमोजणी प्रक्रिया | ४ ऑक्टोबर २०२४ | ४ ऑक्टोबर | ४ ऑक्टोबर |
केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यापूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील(Assembly Elections) लोकांना त्यांचे नशीब बदलायचे आहे. मतदार मोठ्या संख्येने येतील आणि मतदानात महिलांचा सहभाग वाढेल असेही ते म्हणाले. जम्मू आणि काश्मीरमध्ये ८७.९ लाख मतदार आहेत जे मतदानाचा हक्क बजावतील.
सीमांकनानंतर जम्मू आणि काश्मीर विधानसभेत ९० जागा आहेत, जम्मू प्रदेशात ४३ आणि काश्मीरमध्ये ४७ जागा आहेत. यापैकी ७४ जागा सर्वसाधारण, नऊ अनुसूचित जाती उमेदवार आणि सात अनुसूचित जमातीसाठी आहेत. केंद्रशासित प्रदेशातील मतदारांची संख्या ८७.०९ लाख आहे, त्यापैकी ४४.४६ लाख पुरुष आणि ४२.६२ लाख महिला आहेत. २० ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.
दोन दशकांमधील सर्वांत लहान निवडणूक
जम्मू काश्मीरच्या निवडणुकीचा टप्पा महत्त्वाचा आहे, कारण गेल्या दोन दशकांमध्ये केंद्र शासित प्रदेशाच्या सुरक्षेच्या कारणास्तव, किमान चार किंवा त्याहून अधिक टप्प्यांमध्ये सातत्याने निवडणुका झाल्या आहेत. २००२ मध्ये, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये चार टप्प्यांत मतदान घेण्यात आले. २००८ मध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये सात टप्प्यांत निवडणुका झाल्या; आणि २०१४ मध्ये पाच टप्प्यांत घेण्यात आले. ऑगस्ट २०१९ मध्ये, केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधून लडाखचा केंद्रशासित प्रदेश काढला. त्यापूर्वी राज्यात १११ जागा होत्या.
केवळ तीन टप्प्यांत निवडणुका घेण्याच्या निर्णयाबाबत विचारले असता, कुमार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीदरम्यान आयोगाचा अनुभव लक्षात घेऊन ही प्रक्रिया लहान ठेवण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेण्यात आला आहे.