Babanrao Gholap Returns To Uddhav Thackeray Left Eknath Shinde Party : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊ ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. अनेक पक्षांनी त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. दरम्यान, महाविकास आघाडी व महायुतीत अनेक पक्ष असल्यामुळे अनेक जागांसाठी वेगवेगळ्या पक्षांमध्ये बरीच घासाघीस चालू आहे. दरम्यान, अनेक मतदारसंघांमध्ये उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असलेले नेते बंडखोरी करत आहेत. काही नाराजांनी पक्ष बदलून तिकीट मिळवण्याचे प्रयत्न चालवले आहेत. तर काही नाराजांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ दोनच दिवस बाकी असताना शिवसेनेने (ठाकरे) एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. शिंदेंच्या पक्षातील माजी आमदाराने उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेनेचे (शिंदे) उपनेते व माजी आमदार बबनराव घोलप यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे. घोलप यांनी काल (शनिवार, २६ ऑक्टोबर) शिंदे गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. आज त्यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मनगटावर शिवबंधन बांधून घरवापसी केली आहे.

हे ही वाचा >> NCP Candidate 3rd List : मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर; कोणाला कोणत्या मतदारसंघातून मिळाली उमेदवारी?

देवळाली विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेने (ठाकरे) पुत्र योगेश घोलप यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत (शिंदे) गेलेले माजी मंत्री बबनराव घोलप यांनी आज घरवापसी केली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये आता भाजपापाठोपाठ आता शिवसेनेलाही (शिंदे) गळती लागल्याचं पाहायला मिळत आहे.

हे ही वाचा >> Raj Thackeray : राज ठाकरेंनी लढवलेली आणि जिंकलेली एकमेव निवडणूक कुठली? त्यांनीच दिलं उत्तर म्हणाले..

सहा महिन्यांत घरवापसी

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. वाकचौरेंबरोबरच्या संघर्षामुळे बबनराव घोलप यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती. मात्र आता त्यांची घरवापसी झाली आहे.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीआधी वाकचौरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ते लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले. त्यानंतर भाजपात आणि आता ते पुन्हा शिवसेनेत (ठाकरे) परतले आहेत. मात्र वाकचौरेना पक्षात प्रवेश दिल्यानंतर शिर्डीतील माजी आमदार व माजी मंत्री बबनराव घोलप नाराज झाले आणि एकनाथ शिंदेंच्या पक्षात गेले. मात्र आता ते उद्धव ठाकरे यांच्याकडे परतले आहेत.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Babanrao gholap joins uddhav thackeray shivsena left eknath shinde before assembly polls asc