भाजपाकडून रविवारी ९९ उमदेवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अचलपूर मतदारसंघाचाही समावेश आहे. भाजपाने अचलपूरमधून बच्चू कडूंविरोधात प्रवीण तायडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यानंतर आता विविध राजकीय वर्तुळात विविध चर्चांनाही उधाण आलं आहे. दरम्यान, बच्चू कडू यांनीही यावरून भाजपाला लक्ष्य केलं.
बच्चू कडू यांनी आज नागपूर विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यानच त्यांना प्रवीण तायडे यांच्या उमेदवारीबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, केंद्रात सत्ता असतानाही नवखे कार्यकर्ते देणे ही भाजपाची हार आहे, अशी टीका बच्चू कडू यांनी केली.
हेही वाचा – उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांची भेट? संजय राऊतांचा अमित शाह यांना फोन? विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?
नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?
“भाजपा आपल्याच उमेदवाराला बळी देत आहे, की काय अशी परिस्थिती आहे. प्रवीण तायडे हा नवा कार्यकर्ता आहे. खरं तर अचलपूरमध्ये अनेक जुने कार्यकर्ते आहेत, ज्यांनी पक्षासाठी स्वतःवर गुन्हे दाखल केले. मात्र, केंद्रात सत्ता असतानाही नवखे कार्यकर्ते देणे ही भाजपाची हार आहे”, असे ते म्हणाले.
“काँग्रेसयुक्त अचलपूर करण्याचा भाजपाचा प्रयत्न”
पुढे बोलताना, “ज्यांनी राम मंदिर आंदोलनात सहभाग घेतला आणि त्या आंदोलनात ज्यांचं कुटुंब बरबाद झालं. अशांना भाजपा निवडून आणू शकत नाही, हे मोठं दुर्दैव आहे. भाजपा संपूर्ण देशात काँग्रेस मुक्तचा नारा देते. पण अचलपूरमध्ये काँग्रेसयुक्त अचलपूर करण्याचा भाजपाचा प्रयत्न दिसून येतो आहे” , अशी खोचक टीकाही बच्चू कडू यांनी केली. तसेच “बच्चू कडूने महाराष्ट्रात जे संघटन निर्माण केलं आहे. त्यानंतर दोन्ही मोठ्या पक्षांना बच्चू कडू नको आहे. म्हणूनच अचलपूरमध्ये भाजपा-काँग्रेसबरोबर अघोषित युती म्हणून लढणार आहे” , असा टोलही त्यांनी लगावला.
“तिसऱ्या आघाडीच्या जागावाटपावरही केलं भाष्य”
यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीच्या जागावाटपावरही भाष्य केलं. “आज राजू शेट्टी, संभाजीराजे छत्रपती आणि इतर काही नेते असे आम्ही सगळे बैठक घेणार आहोत. या बैठकीत जागावाटपावर चर्चा होईल. ज्या जागांवर आमचे उमेदवार जिंकून येण्याची क्षमता आहे, तिथे आम्ही उमेदवार देऊ. आमच्या उमेदवारांची यादी आज किंवा उद्या संध्याकाळपर्यंत जाहीर करू ही जवळपास १०० उमेदवारांची यादी असेल. कोणतेही मोठा नेता असेल तरी त्यांच्या विरोधात आम्ही उमेदवार देणार असून आम्हाला कोणतीही भीती नाही”, असं ते म्हणाले.
हेही वाचा – मविआ, महायुतीला तगडं आव्हान, परिवर्तन महाशक्ती आघाडीकडून १० उमेदवारांची पहिली यादी जाहीर
“महाविकास आघाडीतील वाद केवळ खुर्चीसाठी”
दरम्यान, विदर्भातील १२ जागांवरून महविकास आघाडीत वाद असल्याची सुत्रांची माहिती आहे. याबाबत विचारला असता, “हे सगळं खुर्चीसाठी सुरु आहे. त्यांना सामान्य माणसाशी काही घेणेदेणे नाही. यांच्यात प्रचंड फूट पडणार आहे आणि माऱ्यामाऱ्या होणार आहे, आतमध्ये प्रचंड खदखद आहे”, असे ते म्हणाले.