आमदार बच्चू कडू यांनी महायुतीच्या विरोधात घेतलेली भूमिका सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. बच्चू कडूंनी महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचार सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी नुकतंच राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी एका जाहीर सभेत भाषण केलं. या भाषणात बच्चू कडू यांनी त्यांच्या शैलीत टोलेबाजी केली. “मी एक नेता म्हणून नाही तर शेतकऱ्यांचा कार्यकर्ता म्हणून राजू शेट्टींच्या प्रचाराला आलो आहे”, असं म्हणत मोदी सरकारच्या शेतकरी धोरणांवरही त्यांनी टीका केली.
काय म्हणाले बच्चू कडू?
बच्चू कडूंनी यावेळी छत्रपती शिवरायांच्या एका विधानाचा दाखला दिला. “नेता म्हणून नाही तर शेतकऱ्याचा कार्यकर्ता म्हणून राजू शेट्टींच्या प्रचाराला आलो आहे. छत्रपती शिवरायांनी शेतकऱ्याच्या पिकाच्या देठालाही हात लावाल तर कापले जाल असं म्हटलं होतं. जो असं करेल, त्याला कापण्यासाठी राजू शेट्टींना आपण दिल्लीत पाठवायचं आहे”, असं ते म्हणाले.
“तुमची औकात नाही”
“सध्या सगळे जात आणि धर्म सांगत आहेत. कुणी म्हणतं मुस्लीम धोक्यात आहेत, कुणी म्हणतं हिंदू धोक्यात आहेत. पण हिंदू-मुस्लीम धोक्यात नाहीत, शेतकरी-मजूर धोक्यात आहेत. तुम्ही जाती-धर्माच्या नावाने भांडत आहात. तुमची औकात नाही. तुमच्या मनगटात दम नाही. जात आणि धर्म सोबत आणल्याशिवाय तुम्हाला निवडणूक जिंकता येत नाही एवढे तुम्ही पांडू आहात”, असा टोला बच्चू कडूंनी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना लगावला. “काँग्रेसवाले म्हणतात हिंदू दहशतवाद वाढत चाललाय आणि भाजपावाले म्हणतात मुस्लीम दहशतवाद वाढतोय”, असंही ते म्हणाले.
“माझ्या पक्षाचं चिन्ह न्यायालयातून…”, राज ठाकरेंचा शिंदे गटाला टोला; शिवसेनेच्या ऑफरबाबत म्हणाले…
“दबाव फक्त शेतकऱ्यांचा”
“मला इथे यायच्या आधी भरपूर फोन आले. मी त्यांना सांगितलं आमच्यावर दबाव फक्त शेतकऱ्याचा पडू शकतो, नेत्याचा पडू शकत नाही. अजून आमच्यावर दबाव टाकणारा कुणी अजून पैदा झालेला नाही. आम्ही शेतकरी बनून जन्माला आलो आणि शेतकरी म्हणूनच मरणार. यांची तिकिटं दिल्लीहून पक्की होतात, आमचं तिकीट गावांमधून पक्कं होतं”, अशा शब्दांत बच्चू कडूंनी हल्लाबोल केला.
“देशात शेतकरी-मजूरांची संख्या ६० ते ७० कोटी आहे. पण राज्याच्या अर्थसंकल्पात निधी ५ लाख कोटींपैकी फक्त २० हजार कोटी दिला. सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या २० लाख आहे तर त्यांचं अर्थसंकल्पात अडीच ते तीन लाख कोटी बजेट आहे. बांधकाम मजूराला ३०० रुपये रोज आहे आणि तिथे रस्त्याचं मोजमाप करणाऱ्या अभियंत्याला १५०० रुपये रोज आहे. पण कुणीही आवाज उठवत नाही. ग्रामीण भागाला मिळणारा निधी, शेतकऱ्यांचा अर्थसंकल्पातला हिस्सा हे आकडे पाहिले तर तुम्ही त्यांना मत नाही, लाथा माराल. ४५ लाख कोटींमध्ये शेतकऱ्यांसाठी किती पैसे ठेवले? आम्हाला एवढं मूर्ख समजता का तुम्ही?” अशी टीका बच्चू कडू यांनी यावेळी केली.