अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष महायुतीमधील सदस्य पक्ष असला तरा बच्च कडूंचा गेल्या काही महिन्यांपासून महायुतीशी संघर्ष चालू आहे. कडू यांनी भारतीय जनता पार्टीवरील त्यांची नाराजी सातत्याने बोलून दाखवली आहे. भाजपा महायुतीतल्या छोट्या पक्षांना योग्य पद्धतीने वागवत नसल्याचा आरोपही कडू यांनी अनेक वेळा केला आहे. तसेच अमरावतीत बच्चू कडू आणि विद्यमान खासदार तथा भाजपाच्या अमरावती लोकसभेच्या उमेदवार नवनीत रणा यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष चालू आहे. भाजपाने नवनीत राणा यांना लोकसभेची उमेदवारी देताना मित्रपक्षांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही, असा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. त्यामुळे बच्चू कडू यांनी अमरावतीत प्रहारकडून दिनेश बूब यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे. अमरावतीत नवनीत राणा, त्यांचे पती आणि बडनेराचे आमदार रवी राणा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाचा प्रचार करत आहेत. तर बच्चू कडू हे दिनेश बूब यांचा प्रचार करत आहेत. या प्रचारादरम्यान, राणा दाम्पत्य बच्चू कडूंवर आणि बच्चू कडू राणा दाम्पत्यावर टीका करत आहेत.
आमदार रवी राणा यांनी प्रचारादरम्यान प्रहारचे उमेदवार दनेश बूब यांच्यावर टीका केली होती. तसेच ते जुगार खेळतात, मद्यप्राशन करतात असा आरोपही केला होता. या आरोपांना आता आमदार बच्चू कडू यांनी उत्तर दिलं आहे. बच्चू कडू म्हणाले, रवी राणांनी दिनेश बूब किंवा इतर कुठल्याही नेत्यावर व्यक्तीगत टीका करू नये. आम्ही जर त्यांच्या व्यक्तीगत गोष्टी बाहेर काढल्या तर ते त्यांना कठीण जाईल. त्यामुळे त्यांनी असं करू नये. सार्वजनिक जीवनात तो माणूस म्हणजेच दिनेश बूब हा रवी राणांपेक्षा लाख पटीने चांगला आहे. त्यांनी ज्या पद्धतीने कामं केली आहेत ते पाहता मला नाही वाटत की, रवी राणा हे त्यांची बरोबरी करू शकतील. आपण तर त्यांचे (नवनीत राणा) चित्रपटातले सीन (प्रसंग) पाहिले तर त्यात ते खुलेआम मद्यप्राशन करताना दिसतात. मात्र आम्ही या गोष्टी काढायला नाही पाहिजेत आणि आम्ही तो नियम पाळतो. तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर जात असाल तर तुमच्याही गोष्टी बाहेर येतील. व्यक्तिगतरित्या इतक्या खालच्या पातळीवर जाऊन आरोप करणं योग्य नाही.
बच्चू कडू म्हणाले, नवनीत राणा यांना पाडण्यासाठी सर्वात मोठा हातभार कोणाचा असेल तर तो रवी राणांचा अशेल. त्यांची जी भाषा आहे आणि ते व्यवस्थित वागले असते तर ही वेळ आली नसती. पण आता नवनीत राणा यांना निवडणुकीमध्ये पाडण्याचे श्रेय रवी राणा यांना जाईल.
हे ही वाचा >> Heatwave : उष्माघाताची बातमी देताना दूरदर्शनची अँकर स्टुडिओतच कोसळली, VIDEO व्हायरल
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीतल्या दर्यापूर नवनीत राणांच्या प्राचार्थ आयोजित सभेला संबोधित करताना महायुतीतल्या सर्व प्रमुख नेत्यांचा आणि पक्षांचा उल्लेख केला. मात्र फडणवीसांनी बच्चू कडू आणि त्यांच्या पक्षाचा उल्लेख करणं टाळलं. त्यामुळे बच्चू कडूंच्या पक्षाला महायुतीतून बाहेर काढल्याची चर्चा रंगू लागली आहे. यावरही बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी आमचा उल्लेख केला नाही, आमच्या पक्षाचं नाव घेतलं नाही याबाबत मी त्यांचा आभारी आहे. त्यांनी आमचं नाव घेतलं नाही ते बरं केलं. कारण त्यांनी आमचं नाव घेतलं असतं तर लोकांच्या मनात शंका निर्माण झाल्या असत्या. त्यामुळेच त्यांनी आमचंच काम केलं आहे.