Rahul Gandhi’s Bags Checked At Amaravati: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघे चार दिवस उरले आहेत. अशात आता सर्वच नेते मंडळींच्या प्रचाराला धार चढली आहे. राज्याबाहेरील विविध पक्षांचे नेतेही प्रचारात उतरले आहेत. भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी प्रचारासाठी हजेरी लावली आहे. आता काँग्रेसकडून अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, तेलंगनाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्यानंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधीही काँग्रेस उमेदवारांसाठी सभा घेत आहेत. दरम्यान, राहुल गांधी अमरावती येथे प्रचारासाठी दाखल होताच, हेलिकॉप्टरमधून उतरताना निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या बॅगा तपासल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून फक्त इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या बॅगांची तपासणी होत असल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहेत.
यापूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांकडून त्यांच्या बॅगा तपासल्याचे दिसत होते. हा व्हिडिओ शेअर करताना उद्धव ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेत्यांच्या बॅगा अशाप्रकारे तपासल्या जातात का”? यानंतर भारतीय जनता पक्षाने निवडणूक अधिकारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या बॅगाही निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते.
काय म्हणाले राहुल गांधी?
राहुल गांधी यांनी आपल्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदीवर जोरदार टीका केली. यावेळी राहुल गांधी टोला लगावत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात तेसुद्धा आता त्यांच्या लक्षात राहत नाही.
यावेळी राहुल गांधी म्हणाले, “माझ्या बहिणीने सांगितले की तिने नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रचार सभेतील भाषण ऐकले. पंतप्रधान त्यांच्या भाषणांत आपण (काँग्रेस) जे बोलतो तेच बोलत आहेत. मला माहीत नाही पण, कदाचित त्यांची स्मृती गेली असेल. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनाही असेच व्हायचे, त्यांना मागून सांगायला लागायचे. त्यांची स्मृती गेली होती. त्याचप्रमाणे पंतप्रधानांचीही स्मृती गेली असेल.”
हे ही वाचा: “राहुल गांधी अजुनही अपरिपक्व नेते”, संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांची टीका
२० नोव्हेंबरला राज्यात मतदान
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला एकाट टप्प्यात २८८ मतदारसंघात मतदान होणार आहे. तर, मतमोजणी २३ नोव्हेंबरला होणार आहे. एकीकडी महायुतीच्या माध्यमातून भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत राहण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर, दुसरीकडे पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राज्यभरात प्रचाराचा धुरळ उडवत आहेत.