Balasaheb Thorat : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला आहे. संगमनेरमधून बाळासाहेब थोरात पराभूत झाले आहेत. बाळासाहेब थोरात यांनी आत्तापर्यंत आठवेळा निवडणूक लढवली होती आणि ते एकदाही हरले नव्हते. मात्र आता नवव्या वेळी त्यांचा पराभव झाला आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ), विजय वडेट्टीवार आणि विश्वजित कदम हे पिछाडीवर असल्याचे सुरुवातीच्या फेरीतून समोर आलं होतं. आता बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांचा पराभव झाला आहे.
बाळासाहेब थोरात यांनी काय म्हटलं होतं?
बाळासाहेब थोरात यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं की काँग्रेससह महाविकास आघाडीला १८० जागा मिळाल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नका. मात्र हे म्हणणाऱ्या बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीची सत्ता आल्यास ते मुख्यमंत्रिपदाचेही प्रमुख दावेदार मानले जात होते. शांत आणि संयमी नेते पण राजकारणात मुत्सदीगिरी करणारे नेते अशी त्यांची ओळख होती. मात्र बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) आता निवडणुकीत पराभूत झाले आहेत. त्यामुळे काँग्रेससाठी हा धक्का मानला जातो आहे.
महाराष्ट्रात महायुतीचा जोर
महाराष्ट्रात महायुतीचा जोर प्रचंड प्रमाणात दिसून येतो आहे. कारण २०० हून जास्त महायुतीने आघाडी घेतली आहे. लाडकी बहीण योजना, तसंच विकासाचे मुद्दे, बटेंगे तो कटेंगे सारख्या घोषणा याची जादू चालली आहे असं दिसून येतं आहे. लोकसभेत खरंतर भाजपासह महायुतीला मोठा फटका बसला होता. मात्र त्याचा वचपा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि महायुतीने काढला आहे असंच दिसून येतं आहे. आम्हाला हा निकाल मान्य नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मात्र महाविकास आघाडीला अवघ्या ४९ ते ५० जागांवर आघाडी आहे हे आत्ताचे कल सांगत आहेत. पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले हे पिछाडीवर आहेत तर बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे.
महाविकास आघाडीला फटका
महाराष्ट्रात २०१९ ला महायुतीला कौल मिळाला होता. भाजपाला १०५ जागा आणि शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या होत्या. महायुतीला जनतेने कौल दिला होता. मात्र मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्यावरुन भाजपा आणि शिवसेना यांच्यातले वाद विकोपाला गेले आणि त्यानंतर महायुती तुटली. या घटनेनंतर महाविकास आघाडी स्थापन झाली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्ष येऊन सरकार उदयाला आलं आणि उद्धव ठाकरे अडीच वर्षे या सरकारमध्ये मुख्यमंत्री होते. त्यानंतर २०२२ ला हे सरकार पडलं. २०२३ ला अजित पवारही महायुतीच्या सत्तेत आले. यानंतर सगळी राजकीय गणितं बदलली होती. आता या निवडणुकीत काय होणार हे पाहणं महत्त्वाचं होतं. मात्र काँग्रेससह महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे हेच निकाल आणि कल सांगत आहेत.