Baramati Assembly Election : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्षांच्या नेत्यांनी मतदारसंघात पुन्हा एकदा आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. एवढंच काय तर राज्यातील काही बड्या नेत्यांसाठी २०२४ च्या विधानसभेची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. यामध्ये आतापर्यंत सातवेळा आमदार राहिलेले आणि तब्बल पाचवेळा राज्याचे उपमुख्यमंत्रिपद भुषवलेले अजित पवार यांच्यासाठी देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. खरं तर गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवारांचं वर्चस्व राहिलंय. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात २०२३ मध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांनी काही आमदारांना घेऊन आपली वेगळी चूल मांडली. त्यामुळे पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असे दोन पक्ष तयार झाले. त्यामुळे अर्थात राजकीय समीकरणे बदलली आणि याचाच प्रत्यय आपल्याला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात पाहायला मिळाला.

लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशाचं लक्ष बारामती मतदारसंघाकडे लागलं होतं. आता विधानसभेला देखील बारामती मतदारसंघ चर्चेत असणार यात काही शंकाच नाही. यातच बारामतीची लढाई म्हणजे काका आणि पुतण्यासाठी प्रतिष्ठेची असणार. त्यामुळे बारामतीत आतापासूनच राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. बारामती म्हटलं की, देशाचं राजकारण असो किंवा राज्याचं नेहमीच चर्चेत असते. लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे आमने-सामने होत्या. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवारांची अर्थात काका पुतण्याची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यानंतर आता विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा बारामतीत काका-पुतण्या भिडण्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पवार हे अजित पवारांच्या विरोधात मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा आहेत. असं असलं तरी अजित पवार यांनी काही दिवसांपासून आपण सात ते आठ वेळा निवडणूक लढलो आहोत, त्यामुळे आपल्याला रस नसल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या या विधानामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांचं नावही बारामती विधानसभेसाठी चर्चेत असल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा : Malad West Assembly constituency : काँग्रेस मालाड पश्चिमचा गड राखणार की महायुती मुसंडी मारणार?

अजित पवार यांनी १९८२ साली राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर एकदा खासदार, आतापर्यंत सातवेळा आमदार आणि तब्बल पाचवेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत. आता महायुतीच्या सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामधील महत्त्वाच्या नेत्यांमध्ये अजित पवारांचं नाव प्रामुख्याने येतं. खरं तर खासदार, आमदार, मंत्री, अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अशी अनेक महत्वाची पदे अजित पवारांनी भूषवले आहेत. मात्र, तरीही २०२४ ची विधानसभा निवडणूक अजित पवारांसाठी महत्वाची मानली जाते. राष्ट्रवादीतील फुटीनंतर त्यांची ही पहिलीच निवडणूक असल्याने ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची असल्याचं म्हटलं जातं.

बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार सध्या विद्यामान आमदार आहेत. त्यामुळे महायुतीच्या फॉर्मुल्यानुसार ती जागा अजित पवारांकडेच राहील. त्यामुळे महायुतीकडून अजित पवार हेच येथील उमेदवार असतील असं सध्या तरी मानलं जातं. यामध्ये आणखी काही गणितं बदलूही शकतात. दुसरीकडे महाविकास आघाडीतही बारामतीची जागा ही शरद पवार गटाकडे राहील. त्यामुळे शरद पवार गटाकडून सध्या तरी युगेंद्र पवार प्रबळ दावेदार मानले जातात. यामध्येही ऐनवेळी आणखी काही गणितं बदलू शकतात. पण अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी सख्या काका-पुतण्याची लढाई झाली तर अतिशय अटीतटीची होईल यात शंकाच नाही.

बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार?

लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या आमनेसामने होत्या. मात्र, तरीही शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच प्रतिष्ठेची लढत मानली गेली. आता विधानसभेला पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशीच लढत रंगण्याची चिन्ह आहेत. अद्याप कोणत्याही पक्षाचे उमेदवार जाहीर झाले नसले तरी बारामतीत अजित पवार यांचे पुत्र जय पवार आणि पार्थ पवार हे अॅक्टीव्ह झाल्याचे दिसते. तसेच अजित पवार हे देखील मतदारसंघात कार्यक्रम घेत आढावा घेत आहेत. दुसरीरकडे लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्यासाठी बारामती तालुका पिंजून काढणारे युगेंद्र पवार हे देखील अॅक्टीव्ह झाल्याचे दिसते. त्यामुळे बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशीच लढत होणार असल्याचं मानलं जातं. मात्र, दोन्हीकडूनही उमेदवार कोण असतील? याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे निवडणूक जशी जवळ जवळ येईल तसं या गोष्टी अजून स्पष्ट होतील.

मतदारांची संख्या

बारामती विधानसभा मतदारसंघात २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार हे जिंकले होते. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे गोपीचंद पडळकर यांचा १ लाखांपेक्षा जास्त मतांच्या फरकाने पराभव केला होता. २०१९ च्या आकडेवारीनुसार बारामती विधानसभा मतदारसंघात पुरुष मतदारांची संख्या १,६२,८३७ तर महिला १,४७,१५५ एवढी आहे.