Maharashtra Lok Sabha Election Results 2024 : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. शरद पवारांच्या पक्षातील आणि कुटुंबातील संघर्षात कोण जिंकणार? याकडे बारामतीसह देशाचं लक्ष लागलं होतं. या संघर्षात शरद पवारांनी बाजी मारल्याचं चित्र दिसू लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट पडल्यानंतर अजित पवारांचा गट भाजपाप्रणित महायुतीत आणि राज्याच्या सरकारमध्ये सहभागी झाला. तर शरद पवारांचा पक्ष महाविकास आघाडीबरोबर विरोधात उभा राहिला आहे. या मतदारसंघात शरद पवार गटाने विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा लोकसभेचं तिकीट दिलं होतं. तर अजित पवार यांनी त्यांच्या पत्नीला म्हणजेच सुनेत्रा पवार यांना या मतदारसंघातून लोकसभेच्या रिगणात उतरवलं होतं. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजय असा संघर्ष चालू आहे. या संघर्षात नणंदबाई म्हणजेच सुप्रिया सुळे यांनी बाजी मारल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा निवडणुकीनंतर मतमोजणीच्या एकूण १८ फेऱ्या असतात. बारामती मतदारसंघातील मतमोजणीच्या १६ फेऱ्या पूर्ण झाल्या असून सुप्रिया सुळे यांना तब्बल ९३,८२८ मतांची निर्णायक आघाडी मिळाली आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून सुप्रिया सुळे यानी आघाडी मिळवली असून मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर ही आघाडी वाढत गेली आहे. आता केवळ दोन फेऱ्यांमधील मतमोजणी बाकी असून सुप्रिया सुळे जवळपास विजयाच्या समीप असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी त्यांच्या बारमतीचा गड राखण्यात यश मिळवल्याची सर्वत्र चर्चा आहे.

हे ही वाचा >> Uttar Pradesh Lok Sabha Election Result 2024 Live : उत्तर प्रदेश भाजपाच्या हातून निसटलं? देशातल्या सर्वात मोठ्या राज्याची स्थिती काय?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट तयार झाल्यानंतर, महायुतीबरोबर गेलेल्या अजित पवारांच्या गटाला महायुतीत लोकसभेच्या केवळ ४ जागा मिळाल्या होत्या. तर महाविकास आघाडीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला १० जागा मिळाल्या होत्या. यापैकी बारामती आणि शिरूर या मतदारसंघात या दोन गटांचे उमेदवार आमनेसामने आहेत. बारामतीत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाली, तर शिरूरमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे विरुद्ध अजित पवार गटाचे शिवाजीराव पाटील यांच्यात सामना रंगला. शिरूरमध्ये अमोल कोल्हे यांनी आघाडी मिळवली आहे. तर बारामतीत सुप्रिया सुळे यांनी तब्बल ९३ हजार मतांची आघाडी घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत पत्नीच्या विजयासाठी अजित पवार यांनी गेल्या अनेक महिन्यांमध्ये हा मतदारसंघ पिंजून काढला होता. तरीदेखील या लढतीत त्यांच्या पत्नी पिछाडीवर आहेत.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baramati lok sabha election 2024 results ncp supriya sule sunetra pawar ajit pawar asc