तेलंगणात निवडणूक प्रचारांना वेग आला आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरा झडत आहेत. आयएएमआयएम हा पक्ष भाजपाची बी टीम असल्याची टीका काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी केली होती. त्यांच्या या टीकेवर असुदूद्दीन ओवेसी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ओवेसी गुरुवारी हैदराबाद येथे बोलत होते.
राहुल गांधींचा आरोप काय?
काँग्रेसविरोधात उमेदवार उभे करण्याकरता एआयएमआयएम पक्ष भाजपाकडून पैसे घेतं, असा आरोप राहुल गांधींनी केला होता. राहुल गांधी बुधवारी तेलंगणाच्या कलवाकुर्थी येथे बोलत होते.
असदुद्दीन ओवैसींचा पलटवार काय?
“माझं नाव असदूद्दीन आहे, म्हणून तुम्ही असे आरोप करता. माझ्या चेहऱ्यावर दाढी आणि डोक्यावर टोपी आहे, त्यामुळे तुम्ही म्हणता की मी पैशांनी विकला जाणार आहे. तुमचा मित्र सिंदिया भाजपात गेले तर त्यांनी पैसे घेतले असं नाही म्हणालात तुम्ही. पण चेहऱ्यावर दाढी आणि डोक्यावर टोपी घालणाऱ्यावर तुम्ही आरोप केले. आता चेहऱ्यावर दाढी आणि डोक्यावर टोपी घालणाराच तुम्हाला सांगेल की याची काय किंमत चुकवावी लागेल”, असं असदुद्दीन ओवेसी म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, “आम्ही कोणाचीही बी टीम वगैरे नाही. आम्ही बी टीम आहोत तर तुम्ही कोणत्या टीमचे आहात ते सांगू का? तुम्ही कुठून आला ते सांगू का? मी आधीही बोललोय की राहुल गांधींनी हैदराबादमध्ये यावं आणि माझ्याविरोधात लढावं. तुम्ही इथं तिथं फिरून बोलता, पण हैदराबादमध्ये येऊन माझ्याविरोधात लढून दाखवा. तुमचं अख्ख कुटुंब घेऊन या, आरएसएसला घेऊन या”, असं आव्हान असदुद्दीन ओवैसी यांनी दिली.
दरम्यान, ३० नोव्हेंबर रोजी तेलंगणात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.