Karnataka Vidhan Sabha Election Results 2023: देशपातळीवर सध्या चर्चेचा विषय ठरलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागणार असून त्याकडे भाजपा आणि काँग्रेससह देशभरातील विरोधी पक्षांचं लक्ष आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची ही पूर्वतयारी असल्याचं मानलं जात असून कर्नाटक निवडणुकीतील निकाल लोकसभा निवडणुकांची दिशा ठरवतील असंही मानलं जात आहे. मात्र, दुसरीकडे महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मतदारसंघ कुणाच्या पाठिशी उभे राहतात, यावर महाराष्ट्रात तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सीमाभागातील एकूण ६ मतदारसंघांवर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचं प्रामुख्याने लक्ष आहे. या मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाच्या नेत्यांनी प्रचारही केला होता. त्यासोबतच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या भागामध्ये प्रचारसभा घेतल्या होत्या. त्यामुळे या भागातील मतदार महाराष्ट्र एकीकरण समितीला कौल देतात की भाजपा किंवा काँग्रेसची निवड करतात? याकडे लक्ष लागलं आहे.

बेळगावातील कोणत्या मतदारसंघांची चर्चा?

बेळगाव आणि आसपासच्या एकूण ६ मतदारसंघांमध्ये मोठ्या लढती पाहायला मिळणार आहेत. यामध्ये बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण, निपाणी, यमकनर्डी, खानापूर या मतदारसंघांचा समावेश आहे.

१. बेळगाव दक्षिण – रमाकांत कोंडुरकर (महाराष्ट्र एकीकरण समिती) वि. अभय पाटील (भाजपा)

२. बेळगाव उत्तर – आसिफ उर्फ राजू शेठ (काँग्रेस) – रवी पाटील (भाजपा) – अमर येळ्ळूरकर (एकीकरण समिती)

३. बेळगाव ग्रामीण – लक्ष्मी हेब्बाळकर (काँग्रेस) – नागेश मन्नोळकर (भाजपा) – आर. एम. चौगुले (एकीकरण समिती)

४. निपाणी – शशिकला जोल्ले (भाजपा) – काकासाहेब पाटील (काँग्रेस) – उत्तम पाटील (राष्ट्रवादी) – जयराम मिरजकर (एकीकरण समिती)

५. यमकनर्डी – सतीश जारकोहोळ (काँग्रेस) – बसवराज हुंदरी (भाजपा) – मारुती नाईक (एकीकरण समिती)

६. खानापूर – अंजली निंबाळकर (काँग्रेस) – विठ्ठल हलगेकर (भाजपा) – मुरलीधर पाटील (एकीकरण समिती)

या मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाकडून आक्रमक प्रचार करण्यात आला होता. तसेच, या मतदारसंघात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचार करावा, असं आव्हान ठाकरे गटाचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी दिलं होतं.

“‘या’ एका घोषणेने कर्नाटकात भाजपाचा पराभव”, सचिन पायलट यांनी सांगितलं काँग्रेसच्या विजयाचं कारण

कर्नाटकमध्ये २०१८मध्ये काय परिस्थिती?

कर्नाटकमध्ये २०१८ साली झालेल्या २२२ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाने १०४ जागा मिळवत कर्नाटकमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तरी बहुमतापासून त्यांना दूर राहावे लागले. काँग्रेसने ७८ तर जेडीएसने ३७ जागा मिळवल्या होत्या. तर बहुजन समाज पक्ष १, कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी १ आणि अपक्ष १ असे इतर उमेदवार निवडून आले होते. बहुमताचा आकडा ११२ असल्यामुळे २०१८ साली विधानसभा त्रिशंकू झाली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचं निपाणीकडे लक्ष!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं यावेळी कर्नाटकमध्ये ९ जागांवर उमेदवार उभे केले होते. यापैकी निपाणीत उत्तमराव पाटील यांना पक्षानं उमेदवारी दिली होती. यंदाच्या कर्नाटक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला कर्नाटक राज्यात प्रवेश करायचा आहे, असं शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं होतं. तसेच, कर्नाटकमधील पक्षाच्या कामगिरीवर राष्ट्रवादीला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरली आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Belgaum constituency belgavi maharashtra ekikaran samiti karnataka counting pmw
Show comments