छत्रपती संभाजीनगरमधील भाजपाचे स्थानिक नेते व माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी नुकताच शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्याबरोबर काही माजी नगरसेवक, अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठाकरे गटात सहभागी झाले आहेत. यामुळे छ. संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाला मोठं खिंडार पडलं आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महाराष्ट्रात महायुतीवर मात केल्याचं पाहायला मिळालं होतं. अशातच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये पक्षाचे जुने नेते ठाकरे गटात गेल्यामुळे पक्षात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी या सगळ्यावर भाष्य केलं आहे. कराड म्हणाले, आमच्या पक्षाला खिंडार वगैरे काही पडलेलं नाही. उलट आगामी विधानसभा निवडणुकीआधी त्यांच्याकडचे (महाविकास आघाडी) काही मोठे नेते आमच्याकडे येतील.
राजू शिंदेंच्या ठाकरे गटातील प्रवेशावर भागवत कराड म्हणाले, भारतीय जनता पार्टीमध्ये २० वर्षांपूर्वी कमळाच्या चिन्हावर निवडून आलेले एकमेव नगरसेवक म्हणजे राजू शिंदे आहेत. त्यांच्याबरोबर दोन नगरसेवक वगळता कोणीही भारतीय जनता पार्टी सोडलेली नाही. त्यामुळे आमच्या पक्षाला खिंडार वगैरे पडल्याचा भाग नाही. हे लोक गेल्यामुळे भारतीय जनता पार्टीला काहीही फरक पडणार नाही. छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा महायुतीत आमच्या पक्षाला सुटली नव्हती. त्याची खदखद राजू शिंदे यांच्या मनात होती. शिवाय राजू शिंदे यांना आगामी विधानसभा निवडणूक लढवायची आहे. त्यांना छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं आहे. त्यामुळे त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. मात्र महायुतीचे संजय शिरसाट इथे विद्यमान आमदार आहेत. राजू शिंदे यांना ठाकरे गटात चांगली संधी मिळतेय याचा अर्थ त्यांना छत्रपती संभाजीनगर पश्चिममधून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ते तिकडे गेले असावेत. त्यांनी पक्ष सोडण्यास इतर कुठलंही कारण नाही. त्यामुळे त्यांच्या जाण्याने पक्षाला गळती लागलेली नाही.
हे ही वाचा >> सहा तासांच्या पावसांत मुंबईची तुंबई; दुबई-न्यूयॉर्कची उदाहरणं देत मुनगंटीवारांकडून महापालिकेचा बचाव
विधानसभेपूर्वी धमाके पाहायला मिळणार : भागवत कराड
माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड म्हणाले, राजू शिंदे यांना ठाकरे गटाकडून आश्वासन मिळालं असल्यामुळे ते ठाकरे गटात गेले आहेत. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदार संघातून चंद्रकांत खैरे यांच्यासह इतर १० जण विधानसभेची तयारी करत आहेत. ते विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षात अंतर्गत स्पर्धा आहे. याबाबत मला चार जणांचे फोन येऊन गेले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आधी आमच्याकडे देखील त्यांच्याकडचे (महाविकास आघाडी) बडे नेते येणार असून तुम्हाला आगामी काळात मोठे धमाके पाहायला मिळतील.