Rais Shaikh News : विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. काही वेळातच प्रत्येक मतदारसंघातील चित्र स्पष्ट होणार आहे. कोण विजयाची हॅट्ट्रिक करणार तर कुणाला हार मानावी लागणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. आतापर्यंत महायुती २३५ जागांनी आघाडीवर आहे. सकाळपासून आलेल्या आकडेवारीवरून महायुतीने एकहाती विजयाच्या दिशेने वाटचाल केल्याचं दिसत आहे. भिवंडी पूर्व मतदारसंघात जनतेचा कौल शिवसेना आणि मनसेच्या उमेदावाराला न मिळता थेट समाजवादी पार्टीला मिळाल्याचं दिसतंय.
आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, भिवंडी पूर्वमध्ये सपाचे उमेदवार रईस शेख यांना १,१९,६८७ मते मिळाली आहेत, तर शिवसेनेचे उमेदवार संतोष शेट्टी यांना ६७,६७२ मते मिळाली आहेत. यावरुन रईस शेख ५२,०१५ मतांनी आघाडीवर तर इतक्याच मतांनी संतोष शेट्टी पिछाडीवर आहेत “भिवंडीची जनता महाराष्ट्रातील सर्वाधिक सुज्ञ मतदार आहे”, असं म्हणत रईस शेख यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.”
हेही वाचा : Rajapur Assembly Election Results 2024 : राजापुरात किरण सामंत यांचा विजय ; ठाकरे गटाचे राजन साळवी पराभूत
सपाचा ऐतिहासिक विजय
माध्यमांशी संवाद साधताना रईस शेख यांनी म्हटलं की, “तुम्ही वाईटाच्या विरुद्ध उभे असाल आणि खऱ्याची साथ देत असाल, तसेच तुम्ही संविधानाबद्दल बोलत असाल तर भिवंडीची जनता तुमच्याबरोबर उभी राहते. हिंदू-मुस्लीम अशा राजकारणात न पडता भिवंडीच्या जनतेने समाजवादी पार्टीला, लाल टोपीला साथ दिली आहे. तुम्ही स्वत: खरे असाल तर तुमचा विजय नक्की होतो. सपाचा हा एक ऐतिहासिक विजय आहे. भिवंडी शहरातील नागरिक नेहमीच चांगल्या विचारधारेच्या पाठीशी उभे असतात.”
जात-धर्म, पैसे यांवर होणारे राजकारण पूर्णतः संपले
“भिवंडीत आजपासून जात-धर्म, पैसे यांवर होणारे राजकारण पूर्णतः संपले आहे. मला असे वाटले होते की, तीस ते पस्तीस हजारांचा फरक असेल. मात्र, भिवंडीच्या जनतेने भरभरून प्रेम केले आणि सध्या बावन्न हजारांहून जास्त जागांवर सपा आघाडीवर आहे”, असं रईस शेख म्हणाले.
मविआच्या निकालाचं दु:ख आहे…
महाविकास आघाडीत आमचे अनेक साथी मागे आहेत, त्यामुळे मला दु:ख होत आहे. माझ्या विजयाचा मला आनंद आहे, मात्र मविआच्या निकालाचं दु:ख आहे. आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात आमची विचारधारा पोहोचवणार आहोत, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही पैसे, जात-धर्म, ताकद, भीती यावरुन होणारं राजकारण पूर्णत: संपवणार आहोत”, असंही यावेळी रईस शेख यांनी म्हटलं.
हेही वाचा : Swara Bhaskar : पतीच्या पराभवानंतर स्वरा भास्करचा संताप; म्हणाली, “९९ टक्के चार्ज EVM उघडल्या अन्…”
तसेच जनतेचे आभार मानत रईस शेख यांनी पुढे म्हटलं की, “भिवंडीची जनता महाराष्ट्रातील सर्वाधिक समजदार जनता आहे. येथील नागरिकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी चांगले रस्ते, वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी मतदान केलं आहे आणि आम्हाला मदत केली आहे. भिवंडीच्या जनतेने संपूर्ण महाराष्ट्राला मोलाचा संदेश दिला आहे, त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक निवडणुका या फक्त विकासाच्या मुद्दयावर होणार आहेत.”