उद्धव ठाकरेंपुढे मोठा पेच, भिवंडीतील पदाधिकारी रजीनामा देत बंडाच्या तयारीत, मविआतील धुसफूस चव्हाट्यावर?

Bhiwandi East Assembly Constituency : भिवंडी पूर्व मतदारसंघाच्या तिकीटावरून मविआत संघर्ष

Uddhav Thackeray Bhiwandi East Assembly Constituency
भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ सध्या समाजवादी पार्टीकडे आहे. (PC : Shivsena UBT YT, RNO)

Bhiwandi East Assembly Constituency ShivSena Thackeray Faction : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी आग्रही असल्याचं दिसत आहे. या मतदारसंघाचे माजी आमदार रुपेश म्हात्रे यांच्यासाठी शिवसैनिक व शिवसेना पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. म्हात्रे यांच्या उमेदवारीबाबत चर्चा करण्यासाठी भिवंडी जिल्हा मध्यवर्ती शाखेत रविवारी (२० ऑक्टोबर) रोजी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत जिल्हा प्रमुख विश्वास थळे, शहर जिल्हाप्रमुख मनोज गगे, उपजिल्हा प्रमुख प्रकाश भोईर, इरफान भुरे, महिला जिल्हा संघटक रश्मी निमसे, यांच्यासह मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या, युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. या बैठकीत भिवंडी पूर्व शिवाय संपूर्ण भिवंडी लोकसभा मतदारसंघातून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी रुपेश म्हात्रे यांची उमेदवारी उध्दव ठाकरे यांनी जाहीर करावी अशी एकमुखी मागणी केली.

शिवसेना (ठाकरे) उपजिल्हाप्रमुख इरफान भुरे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी रुपेश म्हात्रे यांना उमेदवारी देऊन निवडून आणावं, मतदारसंघात जाहीर सभा घ्यावी. मातोश्रीने सधी दिली नाही तर आपण सर्वांनी मिळून रुपेश म्हात्रे यांचा उमेदवारी अर्ज भरू व त्यांना निवडून आणू. नुसतं भाषण करून काही होणार नाही. उमेदवारांना संधी द्यायला हवी. नुसती भाषणं करून काही होत नाही, तसे केले तर पक्ष संपेल, पक्ष नेतृत्वानेच पक्ष कमकुवत करायला घेतला आहे असा त्याचा अर्थ होईल. म्हणून सर्वांनी एकदा मातोश्रीवर जाऊन आपली भूमिका मांडून सामूहिक राजीनामे देत आपली मागणी मांडावी. मागणी मान्य न झाल्यास रुपेश म्हात्रे यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरावे. आम्ही त्यांच्या पाठीशी उभे असू.

हे ही वाचा >> Chhagan Bhujbal : समीर भुजबळ मविआच्या वाटेवर? ठाकरेंच्या तिकीटावर विधानसभा लढणार? छगन भुजबळ म्हणाले…

भिवंडीत सपा व शिवसेनेत (ठाकरे) धुसफूस?

“शिवसेना (ठाकरे) आमच्या मागणीकडे ठामपणे दुर्लक्ष करीत आहे हा शब्दप्रयोग जरी बरोबर असला तरी आमच्या मागणीकडे पक्षप्रमुख दुर्लक्ष करतात असा त्याचा अर्थ होत नाही. भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ शिवसेना (ठाकरे) पक्षाकडे यावा यासाठी आमचे युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत. रुपेश म्हात्रे दुर्दैवाने २०१९ मध्ये काही मतांनी पराभूत झाले म्हणून ही जागा समाजवादी पक्षाच्या वाट्याला गेली. मागील पराभवामुळे यावेळी देखील ही जागा समाजवादी पार्टीकडे जात असेल तर ते चुकीचे आहे. समाजवादी पक्षाने परस्पर पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. त्यामुळे त्यांचा महाविकास आघाडीशी संबंध नाही. अशा परिस्थितीत रुपेश म्हात्रे यांची भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होईल”, असा विश्वास जिल्हाप्रमुख विश्वास थळे यांनी यावेळी व्यक्त केला.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bhiwandi east maha vikas aghadi clash thackeray shivsena vs samajwadi party rupesh mhatre rno news asc

First published on: 20-10-2024 at 13:21 IST
Show comments