Bhiwandi : भिवंडीत निवडणूक कशी रंगणार? समाजवादी पक्षालाच कौल की शिवसेनेला?

भिवंडीत काय होणार हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.

Bhiwandi News
भिवंडी मतदारसंघात काय होणार? (फोटो-संग्रहीत)

भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ – १३७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, भिवंडी पूर्व मतदारसंघात ठाणे जिल्ह्याच्या १. भिवंडी तालुक्यातील भिवंडी महानगरपालिका वॉर्ड क्र. ६ ते १७, ३६ ते ५० आणि ६२ ते ६५ आणि भिवंडी महसूल मंडळ (भाग) भिनार सझा यांचा समावेश होतो. भिवंडी पूर्व हा विधानसभा मतदारसंघ भिवंडी लोकसभा मतदारसंघात मोडतो.

२००९ मध्ये काय होतं बलाबल?

२००९ मध्ये भिवंडी मतदारसंघातून अबू आझमी निवडून आले होते. समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी शिवसेनेच्या योगेश पाटील यांचा पराभव केला. अबू आझमींना त्या निवडणुकीत ३७ हजार ५८४ मतं मिळाली होती.

२०१४ मध्ये काय होतं बलाबल?

२०१४ मध्ये रुपेश म्हात्रे यांनी भाजपाच्या संतोष शेट्टींचा पराभव केला होता. रुपेश म्हात्रे यांना ३३ हजार ५४१ मतं मिळाली तर संतोष शेट्टी यांना ३० हजार १४८ मतं मिळाली. या निवडणुकीत अबू आझमींना तिसऱ्या क्रमाकांची मतं मिळाली होती. जी १७ हजार ५४१ होती.

२०१९ ची स्थिती काय?

२०१९ ला भिवंडीतलं चित्र पुन्हा बदललं. समाजवादी पक्षाचे रईस शेख हे इथले विद्यमान आमदार आहेत. त्यांनी २०१९ च्या निवडणुकीत रुपेश म्हात्रेंचा पराभव केला. या दोघांमधली लढत चुरशीची झाली. कारण अवघ्या १३०० मतांनी रईस शेख निवडून आले.

रईस शेख यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता

लोकसभा निवडणूक पार पडण्याआधी म्हणजेच एप्रिल २०२४ मध्ये भिवंडीचे आमदार रईस शेख यांनी कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून आमदारकीचा राजीनामा अबू आझमींकडे सोपवला होता. त्यावेळी महिलांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलं होतं. एप्रिल महिन्यात रास्ता रोको आंदोलन करुन रईस शेख यांचा राजीनामा मंजूर करु नये असा आग्रह सगळ्याच आंदोलक महिलांनी धरला होता. ज्यानंतर रईस शेख यांनी राजीनामा मागे घेतला.

लोकसभा निवडणुकीत या भिवंडीत राष्ट्रवादी कांँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते बाळ्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे खासदार झाले आहेत. शरद पवारांच्या पक्षाला जे यश लोकसभा निवडणुकीत मिळालं त्यातली ही जागा महत्त्वाची मानली जाते आहे.

भिवंडीला मुंबईचं गोदाम असं का म्हणतात?

भिवंडी हे ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध शहर आहे. १९७० आणि १९८४ या दोन वर्षांमध्ये घडलेल्या हिंदू मुस्लिम दंगलींमुळे या शहराला मिनी पाकिस्तानही म्हटलं जायचं. कामगारांची वस्ती, मुस्लिम बहुल समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे. तसंच आगरी आणि कोळी वर्ग तसंच पद्मशाळी समाजही या ठिकाणी आहे. भिवंडी हे मुंबईचं गोदाम आहे असं मानलं जातं इतकी गोदामं या भागात आहेत. तसंच भिवंडी हे तालुक्याचं शहर असून ते ठाणे जिल्ह्यात येतं. १९८०, १९८५ च्या दरम्यान हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. आता मात्र भिवंडीकर निवडणुकीत मतदान करताना काय कौल देतील हे सांगता येणं कठीण झालं आहे. तरीही या ठिकाणी शिवसेनेला झुकतं माप देणाराही मतदार आहे आणि समाजवादीला निवडून देणाराही मतदार आहे. यंदाच्या निवडणुकीत भिवंडीत काय होणार हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bhiwandi vidhansabha election news who will win samajwadi party again scj

First published on: 22-10-2024 at 01:10 IST
Show comments