भोकर विधानसभा मतदारसंघ : काँग्रेस अशोक चव्हाणांशिवाय गड राखणार? की भाजपा पहिला विजय साजरा करणार?

भोकर मतदारसंघाचा राजकीय इतिहास नेमका काय? २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीची आकडेवारी काय सांगते? आणि या मतदारसंघातील सध्याचं चित्र काय आहे? याविषयी जाणून घेऊया.

bhokar constituency
भोकर मतदारसंघाचा राजकीय इतिहास ( फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम )

Bhokar Assembly Election 2024 : भोकर विधानसभा मतदारसंघ राजकीय दृष्ट्याने अतिशय महत्त्वाचा असा मतदारसंघ आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघावर काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांच्या कुटुंबियांचे निर्विवाद वचर्स्व राहिलं आहे. मात्र, आता अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केल्याने येथील समीकरणं पूर्णपणे बदली आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस अशोक चव्हाण यांच्याशिवाय पुन्हा या मदारसंघात विजय मिळवणार की भाजपा या मतदारसंघात पहिला विजय साजरा करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या मतदारसंघाचा राजकीय इतिहास नेमका कसा राहिला आहे. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीची आकडेवारी काय सांगते? आणि या मतदारसंघातील सध्याचं चित्र काय आहे? याविषयी जाणून घेऊया.

भोकर विधानसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास?

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून भोकर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. तेव्हापासून ते आजपर्यंत या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व चव्हाण, गोरठेकर आणि किन्हाळकर या तीन राजकीय घराण्यांकडेच राहिले आहे. १९५२ साली झालेल्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसचे दिगांबर बिंदू हे मतदारसंघाचे आमदार झाले. त्यानंतर १९६७, १९७२ आणि १९७८ साली शंकरराव चव्हाण यांनी या मतदारंसघाचे प्रतिनिधीत्व केलं. १९८० आणि १९८५ साली काँग्रेसचे बालाजीराव गोरठेकर हे या मतदारसंघाचे आमदार झाले. १९९० ते १९९५ या दोन्ही निवडणुकीत काँग्रेसचे माधवराव किन्हाळकर यांनी विजय मिळवला. तसेच १९९९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत बालाजीराव गोरठेकर यांनी पुन्हा या मतदारसंघातून विजय मिळवला.

हेही वाचा – Aheri Assembly Constituency : अहेरी विधानसभा मतदारसंघ : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) धर्मरावबाबा आत्रामांना शह देण्यात यशस्वी ठरणार?

पुढे २००४ साली बापुसाहेबर गोरठेकर यांनी, तर २००९ साली काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवत विजय मिळवला. २०१४ साली अशोक चव्हाण यांनी त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांना मतदारसंघातून उभे केले. त्यांनीही या निवडणुकीत विजय मिळवला, तर २०१९ साली पुन्हा अशोक चव्हाण हे मतदारसंघाचे आमदार झाले.

२००९, २०१४ आणि २०१९ ची आकडेवारी काय सांगते?

२००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांना १ लाख २० हजार ८४९ मते मिळाली होती. तर माधवराव किन्हाळकर यांना १३ हजार ३४६ मते मिळाली होती. याशिवाय शिवसेनेचे भीमराव क्षिरसागर ६ हजार ४०५ मतांसह तिसऱ्या स्थानावर तर बसपाचे बापुराव गजभरे ६ हजार २७९ मतांसह चौथ्या स्थानावर होते.

२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी भाजपाच्या माधवराव किन्हाळकर यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत अमिता चव्हाण यांना एकूण १ लाख ७८१ मते मिळाली, तर माधवराव किन्हाळकर यांना ५३ हजार २२४ मते मिळाली होती. याशिवाय शिवसेनेच्या बबन बारसे यांना १२ हजार ७६० तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या धर्मराज देशमुख यांना ७ हजार ८०९ मते मिळाली होती.

२०१९ च्या निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी एक लाख ४० हजार ५५९ मतांसह पुन्हा दणदणीत विजय मिळवला होता. तर भाजपाच्या श्रीनिवास गोरठेकर यांना ४३ हजार ११४ मते मिळाली होती. ते दुसऱ्या स्थानावर होते. याशिवाय तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या नामदेव अयालवड यांना १७ हजार ८१३ मते मिळाली होती.

हेही वाचा – Sakoli Constituency : साकोली मतदारसंघ : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गड राखणार? की भाजपा बाजी मारणार?

या मतदारसंघाची सद्यस्थिती काय?

हा मतदारसंघ नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, अशोक चव्हाण यांनी आता काँग्रेससोडून भाजपात प्रवेश केल्याने येथील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे भाजपाने अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवल्याने ही जागेवर कुणाला उमेदवारी मिळेल. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्यातरी अशोक चव्हाण यांची कन्या अॅड. श्रीजया चव्हाण यांचे नाव चर्चेत आहे. त्यांना भाजपाकडून उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. श्रीजया यांना उमेदवारी मिळाल्यास चव्हाणांची तिसरी पिढी विधानसभेत दिसणार आहे.

दुसरीकडे ही महाविकास आघाडीच्या जागावाटापसून ही जागा काँग्रेसच्या खात्यात जाण्याची शक्यता आहे. आजपर्यंत अशोक चव्हाण यांचे या मतदारसंघात निर्विवाद वचर्स्व राहिलं आहे. त्यामुळे काँग्रेसला इथे उमेदवार शोधण्याची गरजच पडली नाही. मात्र, आता अशोक चव्हाण यांच्या भाजपात जाण्याने काँग्रेससमोर उमदेवार शोधण्याचं मोठं आव्हान असणार आहे. सध्या भोकर मतदारसंघात पक्षाचे जिल्हाध्यक्ष बी.आर.कदम तसेच भोकरचे सुभाष पाटील किन्हाळकर यांची नावे चर्चेत आहेत. प्रा.संदीपकुमार देशमुख या कार्यकर्त्याने ‘भोकरचा आमदार भूमिपुत्रच हवा’ असा नारा देत श्रीजया चव्हाण यांच्या संभाव्य उमेदवारीला आव्हान दिल्याचे दिसून आले आहे. पण यांच्यासह एकूण १४ कार्यकर्त्यांनी निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bhokar constituency congress stronghold political history ashok chavan spb

First published on: 16-10-2024 at 16:21 IST
Show comments