लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र आता जवळपास स्पष्ट होत आलं आहे. सध्या देशात इंडिया आघाडी २३२ जागांवर आघाडीवर आहे. तर भारतीय जनता पार्टी २९२ जागांवर आघाडीवर आहे. थोड्या वेळात सर्व निकाल स्पष्ट होतील. एनडीए आघाडीला बहुमत मिळण्याचा अंदाज असल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात येत देशवाशियांना संबोधित केलं. तसेच एनडीए आघाडी पुन्हा सत्ता स्थापन करेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. मात्र, असं असलं तरी उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला बसला आहे.

उत्तर प्रदेशात भाजपाला केवळ ३३ जागांवर विजय मिळवता आला आहे. एवढंच नाही तर केंद्रीय मंत्री मनेका गांधी सुल्तानपूरमधून पराभव झाला आहे. समाजवादी पक्षाचे उमेदवार रामभुआल निषाद यांनी मनेका गांधी यांचा पराभव केला आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनाही अमेठी मतदरासंघातून पराभवाला सामोर जावं लागलं आहे. त्यामुळे भाजपासाठी हा मोठा धक्का आहे. दरम्यान, भाजपाच्या उमेदवार मनेका गांधी यांचा सुलतानपूर मतदारसंघात समाजवादी पक्षाच्या रामभुआल निषाद यांच्याकडून ४३,१७४ मतांच्या फरकाने पराभव झाला. निषाद यांना ४,४४,३३० मते मिळाली, तर गांधी यांना ४,०१,१५६ मते मिळाली.

हेही वाचा : पंकजा मुंडेंचा बीडमध्ये पराभव, मतमोजणीत नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर धक्कादायक निकाल!

उत्तर प्रदेशमध्ये निम्या जागा राखण्यातही अपयश

उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला मोठं यश मिळालं आहे. समाजवादी पक्षाची ३६ जागांवर आघाडी आहे. तसेच काँग्रेस ६ जागांवर आघाडीवर आहे. समाजवादी पक्ष आणि काँग्रेस मिळून इंडिया आघाडीला ४२ जागांची आघाडी मिळाली आहे. भारतीय जनता पार्टी ३३ जागांवर आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशमध्ये एकूण लोकसभेच्या ८० जागा आहेत. भारतीय जनता पार्टीच उत्तर प्रदेशमध्ये सध्या सरकार आहे. मात्र, तरीही भाजपाला निम्याही जागा मिळवण्यात यश आलं नाही.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा पराभव

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अमेठी मतदरासंघातून लोकसभा निवडणूक लढवली. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे किशोरी लाल शर्मा हे निवडणुकीच्या मैदानात होते. आज लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर स्मृती इराणी या पिछाडीवर होत्या. त्यानंतर अमेठीतून स्मृती इराणींचा पराभव झाला आहे. स्मृती इराणी यांचा काँग्रेसचे किशोरी लाल शर्मांनी यांनी तब्बल १ लाख १८ हजार ४७१ मतांनी पराभव केला आहे.