Lok Sabha Nivadnuk 2024 Schedule : देशात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून केंद्रीय निवडणूक आयोगाने सात टप्प्यातील निवडणूक कार्यक्रम आज जाहीर केला. त्यानुसार १९ एप्रिलपासून देशात लोकसभा निवडणूक होणार असून ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. तर, महाराष्ट्रातही ५ टप्प्यांत निवडणूक होणार आहे. यंदा १८ व्या लोकसभेसाठी निवडणूक होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१९ साली स्थापन झालेल्या मोदी सरकारचा कार्यकाळ ६ जून रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे देशात लोकसभेच्या निवडणुका घेण्यात येत आहे. त्यानुसार, १९ एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होणार असून २ जून रोजी सात टप्पे संपणार आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार म्हणाले, देशात लोकसभा निवडणूक ५४३ जागांवर निवडणूक होणार आहे. सात टप्प्यात ही निवडणूक होणार असून पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी पार पडणार आहे.

देशात सात टप्प्यात निवडणूक होणार

  • फेज १ – १९ एप्रिल
  • फेज २ – २६ एप्रिल
  • फेज ३ – ७ मे
  • फेज ४ – १३ मे
  • फेज ५ – २० मे
  • फेज ६ -२५ मे
  • फेज ७ – १ जून

कोणत्या राज्यात किती टप्प्यांत होणार मतदान?

अरुणाचल प्रदेश, अंदमान-निकोबार, आंध्र प्रदेश, चंदीगढ, दादरा नगर हवेली, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा, केरळ, लक्षद्वीप, लडाख, मिझोराम, मेघालय, नागालँड, पुद्दुचेरी, सिक्कीम, तामिळनाडू, पंजाब, तेलंगणा, उत्तराखंड आदी राज्यांत एका टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

कर्नाटक, राजस्थान, त्रिपुरा, मणिपूर या राज्यांमध्ये दोन टप्प्यांत मतदान होईल. तर, छत्तीसगड, आसाममध्ये तीन टप्प्यांत मतदान होईल. ओडिशा, मध्य प्रदेश, झारखंड या राज्यांमध्ये चार टप्प्यात मतदान होणार असून महाराष्ट्र, जम्मू आणि काश्मीरमध्ये पाच टप्प्यात मतदान होईल. तसंच, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये सात टप्प्यांत मतदान होणार आहे.

हेही वाचा >> Lok Sabha Election 2024 Date Live: १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत सात टप्प्यांत लोकसभा निवडणूक, ४ जूनला लागणार निकाल

महाराष्ट्रात पाच टप्प्यांत होणार मतदान

महाराष्ट्रात ४८ जागांसाठी पाच टप्प्यांत मतदान होणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान ५ जागांसाठी मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिलला होणार असून यावेळी ८ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडेल. ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील प्रक्रियेत ११ जागांसाठी मतदान होणार आहे. तर, १३ मे रोजी होणाऱ्या चौथ्या टप्प्यातील प्रक्रियेतही ११ जागांसाठी मतदान होईल. २० मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान होणार असून १३ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडेल.

हेही वाचा >> Lok Sabha Elections 2024 : निवडणुकीतील काळ्या पैशांवर ‘वॉच’, ११ निवडणुकीत ३४०० कोटींची रक्कम जप्त

महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?️

पहिला टप्पा – १९ एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

️दुसरा टप्पा – २६ एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

तिसरा टप्पा – ७ मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

चौथा टप्पा – १३ मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

पाचवा टप्पा – २० मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

मतमोजणी – ४ जून

कोणत्या राज्यात केव्हा मतदान?

विधानसभेच्याही निवडणुका जाहीर

लोकसभेच्या निवडणुकीसह देशातील काही राज्यात विधानसभेच्याही निवडणुका होणार आहेत. त्यानुसार, सिक्कीमच्या ३२ जागांवर आणि अरुणाचल प्रदेशच्या ६० जागांवर १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर, आंध्र प्रदेशच्या १७५ जागांसाठी १३ मे रोजी मतदान होईल.

यंदाच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य काय?

  • देशात ९६ कोटी मतदार आहेत.
  • ५ लाख मतदान केंद्र आहेत, १.५ कोटी निवडणूक कर्मचारी
  • ५० लाख ईव्हीएम आहेत.
  • आत्तापर्यंत ४०० विधानसभा निवडणूका झालेल्या आहेत. १६ राष्ट्रपती, उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूका झाल्या आहेत. गेल्या वर्षभरात ११ विधानसभा निवडणूका झाल्या आहेत.
  • १.८ कोटी नवमतदार आहेत जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत.
  • ८२ लाख मतदार ज्यांचे वय ८५ वर्षांपेक्षा जास्त आहे.
  • २ लाख मतदार आहेत ज्यांचे वय १०० वर्षांपेक्षा जास्त आहे
  • १८ हजार ट्रान्सजेंडर मतदान
  • ज्यांचे वय ८५ वर्षापेक्षा जास्त असेल, दिव्यांगांमध्ये ज्यांची श्रेणी ४० टक्क्यांपेक्षा जास्त असेल आणि त्यांनी फॉर्म १२ डी च्या माध्यामातून नोंदणी केली तर घरी जाऊन त्यांचे मतदान घेतले जाईल.
मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big news lok sabha election bugle sounded in the country seven phase program announced by ec when will voting be held in maharashtra sgk