Akola Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट होऊ लागले आहेत. निवडणूक आयोगाने अनेक मतदारसंघातील जिंकलेल्या उमेदवारांची नावं जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. तर काही मतदारसंघात अखेरच्या फेऱ्यांमधील मतमोजणी चालू आहे. महाराष्ट्रात दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत (शिवसेनेचा ठाकरे गट), ठाण्यातून नरेश म्हस्के (शिवसेनेचा शिंदे गट), रायगडमधून सुनील तटकरे (राष्ट्रवादीचा अजित पवार गट, दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई (शिवसेनेचा ठाकरे गट), नागपुरातून नितीन गडकरी (भारतीय जनता पार्टी), उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड (काँग्रेस), कल्याणमधून श्रीकांत शिंदे (शिवसेनेचा शिंदे गट), मुंबई उत्तर-पूर्व मतदरसंघातून संजय दिना पाटील (शिवसेनेचा ठाकरे गट) निवडून आले आहेत. तर उरलेल्या मतदारसंघात अजूनही मतमोजणी चालू आहे. मात्र बहुसंख्य मतदारसंघांचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे.

या निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीपेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत. सायंकाळी पाच वाजेपर्यंत राज्यातील २९ जागांवर महाविकास आघाडीने आघाडी घेतली आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत राहणं पसंत केलं असतं तर ही संख्या जास्त असू शकली असती. राज्यात अकोला आणि बीड या दोन मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अकोला मतदारसंघात भाजपाचे अनुप धोत्रे यांना ४,४१,४५५ मतं मिळाली आहेत. तर काँग्रेसच्या अभय पाटलांना ४,०५,५७१ मतं मिळाली आहेत. भाजपा उमेदवाराने या मतदारसंघात अवघी ३५ हजार मतांनी आघाडी घेतली आहे. मात्र याच मतदारसंघात वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना २,६६,९४१ मतं मिळाली आहे. या मतदारसंघात प्रकाश आंबेडकर किंवा अभय पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार असते तर कदाचित त्यांनी सहज दोन लाखांच्या मतांच्या फरकाने विजय मिळवला असता.

हे ही वाचा >> Uttar Pradesh Lok Sabha Election Result 2024 Live : उत्तर प्रदेश भाजपाच्या हातून निसटलं? देशातल्या सर्वात मोठ्या राज्याची स्थिती काय?

प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाने महाविकास आघाडीत येऊन त्यांच्या पक्षाची आणि आघाडीची ताकद वाढवावी यासाठी मविआ नेत्यांनी निवडणुकीच्या आधी अनेक दिवस प्रयत्न केले. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि वंचितच्या नेत्यांबरोबर अनेकवेळा चर्चा केली, बैठका केल्या. मात्र या चर्चा निष्फळ ठरल्या. मविआ नेत्यांनी त्यांना जागावाटपात पाच जागा देण्याचं मान्य केलं होतं. मात्र वंचितने अधिक जागांची मागणी केली. परिणामी ही आघाडी होऊ शकली नाही. अखेर प्रकाश आंबेडकरांनी राज्यातील २० हून अधिक मतदारसंघात त्यांचे उमेदवार उभे केले. मात्र वंचितचा एकही उमेदवार निवडून आला नाही. उलट वंचितच्या उमेदवारांमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांचं नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.