India General Election Result 2024 Exit Poll : गेल्या दीड महिन्यांपासून भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांत एकूण सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. आज देशभरातील आठ राज्यातील एकूण ५७ जागांसाठी शेवटच्या अर्थात सातव्या टप्प्यासाठी मतदान पार पडलं. यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का घसरल्याचं पाहायला मिळालं. भारतीय जनता पार्टी यंदाच्या निवडणुकीत ४०० हून अधिक जागा जिंकण्याचे दावे करत होती. मात्र, आतापर्यंत हाती आलेल्या एक्झिट पोलनुसार भाजपाप्रणित एनडीएला ४०० जागा जिंकता येणार नाहीत. मागील दोन्ही लोकसभा निवडणुकांप्रमाणे एनडीए यंदाही ३०० हून अधिक जागा जिंकू शकते, असे दावे बहुसंख्य एक्झिट पोल्समध्ये करण्यात आले आहेत.
दरम्यान, इंडिया टूडे – अॅक्सिस माय इंडियाने दक्षिण भारतातील तीन राज्यांचे एक्झिट पोल्स जाहीर केले आहेत. इंडिया टूडेने केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटक राज्यांचे एक्झिट पोल सादर केले आहेत. यानुसार केरळ आणि तमिळनाडू या दोन राज्यांमध्ये भाजपाचा चंचूप्रवेश होऊ शकतो. मागील लोकसभा निवडणुकीत या दोन राज्यांमध्ये एकही भाजपा खासदार निवडून आला नव्हता. मात्र यंदा या दोन्ही राज्यांमध्ये भाजपा प्रवेश करेल असा दावा केला जात आहे. तमिळनाडूत लोकसभेच्या ३९ जागा आहेत.
इंडिया टूडेच्या एक्झिट पोलनुसार भारतीय जनता पार्टी तमिळनाडूमध्ये १ ते ३ जागा जिंकू शकते. द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाच्या नेतृत्वात इंडिया आघाडीला तमिळनाडूमध्ये ३३ ते ३७ जागा मिळतील. अण्णाद्रमुक पक्षाला तमिळनाडूमध्ये केवळ १ ते २ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपाने मागील दोन्ही निवडणुकांमध्ये या राज्यात एकही जागा जिंकली नव्हती. मात्र यंदा ते तमिळनाडूमध्ये खातं उघडतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, भाजपा केरळमध्येदेखील चंचूप्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केरळमध्ये काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीला १७ ते १८ जागा मिळतील. तर भाजपाप्रणित एनडीए या राज्यात २ ते ३ जागा जिंकण्याची शक्यता आहे. भाजपाला मागील निवडणुकीत तमिळनाडूप्रमाणे केरळमध्येदेखील नाकारलं होतं. मात्र यंदा त्यांना केरळमध्ये १ किंवा २ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केरळमध्ये इतर डाव्या पक्षांना १ किंवा २ जागा मिळू शकतात. या राज्यात लोकसभेच्या एकूण २० जागा आहेत.
कर्नाटकमध्ये काँग्रेसला धक्का?
दरम्यान, कर्नाटक राज्यात भाजपा मोठी मुसंडी मारेल असं चित्र दिसत आहे. या राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला होता. तर भारतीय जनता पार्टीला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र लोकसभा निवडणुकीत भाजपाने चांगलं यश मिळवलं आहे. इंडिया टूडेच्या पोलनुसार कर्नाटकमध्ये भाजपाला २० ते २२ जागा मिळतील. तर काँग्रेस केवळ ३ ते ५ जागा जिंकू शकते. जेडीएस पक्षाला राज्यात २ ते ३ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कर्नाटकमध्ये लोकसभेच्या एकूण २८ जागा आहेत.