Sanidhi Parvesh Verma on Delhi Assembly Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं जोरदार कामगिरी करत आम आदमी पक्षाला सत्तेतून पायउतार केलं आहे. शिवाय, गेल्या २७ वर्षांची दिल्लीतील सत्तेची प्रतीक्षा भाजपानं संपुष्टात आणली असून मोठ्या मताधिक्यासह भाजपा सत्ता स्थापन करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता आम आदमी पक्षाचं नेमकं कुठे चुकलं? काँग्रेसची राजकीय ध्येयधोरणे या गोष्टी चर्चेत आल्या आहेत. स्वत: अरविंद केजरीवाल यांचाही पराभव झाल्यामुळे यावरून मोठी चर्चा पाहायला मिळत असताना केजरीवाल यांचा पराभव करणारे भाजपा उमेदवार परवेश वर्मा यांची मुलगी सनिधीनं केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहेत दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल?

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं तब्बल ४८ जागांवर मजल मारली असून आम आदमी पक्षाला फक्त २२ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाचा हा मोठा पराभव मानला जात आहे. शिवाय पक्षस्थापनेनंतर पहिल्यांदाच आम आदमी पक्ष विरोधात बसणार आहे. या पार्श्वभूमीवर आता एकीकडे २७ वर्षं सत्तेत नसलेला पक्ष दिल्लीत सत्तेत बसणार असून कधीच विरोधी पक्षात न बसलेला पक्ष विधानसभेत विरोधी बाकांवर बसणार आहे.

सनिधीची वडिलांच्या विजयावर प्रतिक्रिया

दरम्यान, परवेश वर्मा यांची मुलगी सनिधी हिनं आपल्या वडिलांच्या विजयासाठी दिल्लीकरांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय, केजरीवाल यांनाही लक्ष्य केलं आहे. “”मी सर्व दिल्लीकरांना शुभेच्छा देऊ इच्छिते. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाच्याच जोरावर माझे वडील जिंकले आहेत”, असं सनिधी एएनआयला म्हणाली.

“जेव्हा कुणी ११ वर्षं खोटं बोलून सरकार चालवत असेल, लोकांना फसवेल, त्यांचं ऐकणार नाही तेव्हा लोक त्याला एकदा संधी देतील. पण दुसऱ्यांदा त्याला संधी देणार नाहीत. आत्ताही दिल्लीकरांनी तेच केलं आहे. आमचं बहुमतानं सरकार बनणार आहे. हे अपेक्षित होतं. लोकांच्या तक्रारी, अडचणी ऐकायला मिळाल्या तर त्यावरून लगेच ही बाब स्पष्ट होते”, असं सनिधी म्हणाली.

“माझे वडील गेल्या २० वर्षांपासून पक्षाचं काम करत आहेत. पक्षानं जी विचारणा केली, ते काम माझ्या वडिलांनी केलं. आताही पक्ष जे काम करायला सांगेल, ते काम आम्ही प्रामाणिकपणे पार पाडू. पक्षातील वरीष्ठच मुख्यमंत्रीपदाबाबत सांगू शकतील”, असं उत्तर सनिधीनं परवेश वर्मांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेबाबत दिलं.

दिल्लीकरांना समजलं की कोण त्यांच्या भावनांशी खेळत होतं – तृषा

दरम्यान, परवेश वर्मा यांची दुसरी मुलगी तृषा हिनंदेखील केजरीवाल यांना लक्ष्य केलं आहे. “बाबांचं एक ध्येय स्पष्ट होतं की त्यांना अरविंद केजरीवाल यांना सत्तेवरून पायउतार करायचं होतं. सगळे फार तणावात होते. पण आम्ही आधीच म्हणालो होतो की स्पष्ट बहुमत येईल. फक्त योग्य वेळ येणं गरजेचं होतं. दिल्लीवाल्यांना समजलं होतं की कोण त्यांची मस्करी करत होतं, कोण त्यांच्या भावनांशी खेळत होतं. यावेळी दिल्लीकरांनी असत्याला नाकारलं आहे”, असं तृषा म्हणाली.