भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी त्यांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये ७० नावं आहेत. महाराष्ट्रातल्या २० जणांची नावं या यादीत आहेत. भाजपाच्या दुसऱ्या यादीत पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. तसंच गोपाळ शेट्टींचा पत्ता कापण्यात आला असून त्यांच्या जागी पियूष गोयल यांना तिकिट देण्यात आलं आहे. या सगळ्यावर प्रतिक्रिया येत असतानाच एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. भाजपाच्या दुसऱ्या यादीत रक्षा खडसे यांना रावेर लोकसभा मतदारसंघातून तिकिट देण्यात आलं आहे. ज्यानंतरच्या घडामोडीने लक्ष वेधलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरद पवार, एकनाथ खडसे, रोहिणी खडसे यांच्यात बंद दाराआड चर्चा

भाजपाच्या दुसऱ्या यादीत रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसेंना तिकिट देण्यात आलं आहे. त्या अनुषंगाने शरद पवार, एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. महाविकास आघाडीने आम्ही ३५ जागा जिंकणार असा दावा केला आहे. रावेर हा एकनाथ खडसेंचा बालेकिल्ला मानला जातो. त्या अनुषंगाने भाजपाने एकनाथ खडसेंच्या सुनेला म्हणजेच रक्षा खडसेंना तिकिट दिलं आहे. एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. तर त्यांची सून म्हणजेच रक्षा खडसे भाजपात आहेत. रक्षा खडसे २०१९ लाही चांगल्या मतांनी निवडून आल्या होत्या. आता त्यांच्याविरोधात कुठला उमेदवार द्यायचा? त्याचा प्रचार एकनाथ खडसे करणार का? या सगळ्यावर चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. बंद दाराआड झालेल्या चर्चेचा तपशील समजू शकलेला नाही.

हे पण वाचा- वनवास संपला! पंकजा मुंडे पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात, पण प्रीतम मुंडेंचा पत्ता कट

महाविकास आघाडीने रोहिणी खडसे यांना जर रावेरमधून लोकसभेचं तिकिट दिलं तर ही लढत नणंद विरुद्ध भावजय अशी होऊ शकते. बारामतीत जे घडणार आहे तसंच चित्र रावेरमध्येही दिसू शकतं. इतर कुठल्याही उमेदवाराचा प्रचार करण्यापेक्षा एकनाथ खडसे यांना त्यांच्या मुलीचा प्रचार करणंही पर्यायाने सोपं असणार आहे. मात्र याबाबत चर्चा झाली की नाही? ते समजू शकलेलं नाही. असं असलं तरीही भाजपाची दुसरी यादी आल्यानंतर आणि त्यात रक्षा खडसेंचं नाव आल्यानंतर झालेली ही चर्चा महत्त्वाची मानली जाते आहे.

भाजपाने दुसरी यादी देत असताना आणि खासकरुन महाराष्ट्राची यादी देताना ४८ जागांपैकी २० नावं जाहीर केली आहेत. आता उर्वरित २८ जागांपैकी शिवसेना शिंदे गटाला आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला किती जागा मिळणार हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp candidates second list raksha khadse name in it closed door talks between sharad pawar eknath khadse and rohini khadse rno news scj