प्रियांका गांधींनी उमेदवारी अर्ज भरताना मल्लिकार्जुन खरगेंना बाहेर उभं केलं? भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO

Priyanka Gandhi : भाजपा नेते व कार्यकर्त्यांनी हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर केला आहे.

BJP claims Priyanka Gandhi insulted mallikarjun Kharge video
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी देखील हा व्हिडीओ शेअर केला आहे. (PC : Jansatta, @himantabiswa/X)

BJP claims Priyanka Gandhi insults Mallikarjun Kharge : भारतीय जनता पार्टीचे नेते व कार्यकर्ते सध्या काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणआत शेअर करताना दिसत आहेत. या व्हिडीओत दिसतंय की खरगे एका कार्यालयाच्या दरवाजाबाहेर उभे आहेत, कार्यालयाचा दरवाजा थोडासा उघडला आहे आणि ते त्या फटीतून आत डोकावण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, दरवाजाजवळ एक व्यक्ती उभी आहे, जिच्यामुळे दरवाजाबाहेर उभे असलेले काँग्रेस अध्यक्ष आत जाऊ शकत नाहीत असं दिसतंय. खरगेंचा हा व्हिडीओ भाजपा नेते, कार्यकर्ते समाजमाध्यमांवर शेअर करत आहेत आणि दावा करत आहेत की, प्रियांका गांधी लोकसभेचा (पोटनिवडणूक) उमेदवारी अर्ज दाखल करत असताना त्यांनी मल्लिकार्जुन खरगेंना बाहेर उभं केलं होतं.

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी नुकताच वायनाडमधून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रियांका गांधी उमेदवारी अर्ज दाखल करताना खरगे मात्र बाहेर उभे होते असा दावा करणारा व्हिडीओ आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी देखील एक्सवर शेअर केला आहे. प्रियांका गांधींनी खरगेंचा अपमान केल्याचा आरोप भाजपा नेते करत आहेत. काँग्रेसमध्ये केवळ गांधी कुटुंबालाच सन्मान मिळतो, असंही भाजपा नेत्यांचं म्हणणं आहे.

हे ही वाचा >> २६ मतदारसंघांत ‘शिवसेना विरुद्ध शिवसेना’ सामना रंगणार! ठाकरे-शिंदेंकडून उमेदवारांच्या पहिल्या याद्या जाहीर

भाजपाची शेलक्या शब्दांत टीका

हिमंता बिस्व सरमा यांनी एक्सवर हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे की “हे सर्व पाहून वाईट वाटतं. पक्षातील इतक्या वरिष्ठ नेत्याशी चाललेला हा व्यवहार पाहून यातना होतात. तुम्ही ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असा किंवा काँग्रेस प्रदेश कमिटीचे अध्यक्ष, तुम्हाला तिथे सन्मान मिळणार नाही. त्या कुटुंबाला अशा प्रकारे कोणाचाही अपमान करणं आवडतं का? त्यांना केवळ निवडणुकीपुरतं रबर स्टॅम्प म्हणून वागवलं जाणार का?”

हे ही वाचा >> झिशान सिद्दिकींच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दिला उमेदवार; खोचक पोस्टमध्ये म्हणाले, “सुना है पुराने दोस्तों ने…”

दरम्यान, काँग्रेसकडून या व्हिडीओवर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील यावर भाष्य केलेलं नाही. भाजपाने यापूर्वी देखील काँग्रेसवर अशा प्रकारचे आरोप केले आहेत. काँग्रेसमध्ये गांधी कुटुंबाव्यतिरिक्त इतर कोणालाही सन्मान मिळत नाही, तिथे ज्येष्ठ नेत्यांचा अपमान केला जातो असे दावे भाजपाने अनेक वेळा केले आहेत. यामुळे काग्रेस अनेकदा वादात अडकली आहे. दुसऱ्या बाजूला, काही प्रसारमाध्यमांनी म्हटलं आहे की मल्लिकार्जुन खरगे सुरुवातीला प्रियांका गांधींबरोबर निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात होते. मात्र, काही वेळाने ते बाहेर गेले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp claims priyanka gandhi insulted mallikarjun kharge stand outside while nomination filing asc

First published on: 24-10-2024 at 12:44 IST
Show comments