BJP Vote Counting Highlights, Delhi Election Results 2025: दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी दि. ५ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले. ९४.६ लाख मतदारांनी राजधानी दिल्लीचा निर्णय मतपेटीत बंद केला. आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल हे चौथ्यांदा मुख्यमंत्री बनणार की भाजपा २७ वर्षांनी दिल्लीत सत्ता स्थापन करणार? याचा निकाल आज (शनिवार, ८ फेब्रुवारी) रोजी लागणार आहे. दिल्लीकरांसह संबंध देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. दिल्लीचा निकाल हा देशातील राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून इंडिया आघाडीचे भवितव्य ठरणार आहे. भाजपाचा विजय झाल्यास इंडिया आघाडीला हा मोठा धक्का मानला जाईल. निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडीत दोन गट पडले होते. इंडिया आघाडीतील काही पक्षांनी ‘आप’ला तर काहींनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. दिल्लीच्या निकालानंतर इंडिया आघाडीचे नेतृत्व कोण करणार? यावरून वाद निर्माण होऊ शकतो.

एक्झिट पोलचे अंदाज काय सांगतात?

दिल्लीतील मतदान झाल्यानंतर दहा प्रमुख एक्झिट पोल्सपैकी ८ जणांनी भाजपाच्या बाजूने कौल दिला होता. भाजपाचे सरकार बहुमत घेऊन स्थापन होईल, असा अंदाज या एक्झिट पोल्सनी वर्तविला होता. तर ‘आप’ची काठावर सत्ता येणार असल्याचे दोन एक्झिट पोल्सनी सांगितले होते.

Live Updates

BJP Delhi Election 2025 Results LIVE, 08 Feb 2025 | भाजपा दिल्ली विधानसभा निवडणूक निकाल २०२५ लाईव्ह

16:11 (IST) 8 Feb 2025

BJP Delhi Election Results 2025 Live: भाजपाने ३७ जागा जिंकत बहुमताचा आकडा केला पार

दिल्ली विधानसभेचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. भाजपाने ३७ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले आहे. तर आणखी ११ जागांवर त्यांनी आघाडी घेतली आहे. जर या ठिकाणीही त्यांचा विजय झाल्यास भाजपाची संख्या ४८ वर पोहोचू शकते.

12:41 (IST) 8 Feb 2025

BJP Delhi Election 2025 Results LIVE: भाजपाचे तरविंदर सिंह ठरले जायंट किलर, मनीष सिसोदियांचा केला पराभव

आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते, दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा जंगपुरा विधानसभा मतदारसंघात पराभव झाला आहे. भाजपाचे तरविंदर सिंह मारवाह हे जायंट किलर ठरले असून त्यांनी ६०० मतांनी सिसोदिया यांचा पराभव केला आहे.

12:19 (IST) 8 Feb 2025

BJP Delhi Election 2025 Results LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी ७ वाजता भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सायंकाळी ७ वाजता दिल्ली येथे भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. दिल्लीमध्ये तब्बल २७ वर्षांनंतर भाजपाचा विजय होत आहे, त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

11:36 (IST) 8 Feb 2025

BJP Delhi Election 2025 Results LIVE: बहमतापेक्षा अधिक जागांवर आघाडी घेताच भाजपा नेत्यांची बैठक सुरू

दिल्लीमध्ये भाजपाने ७० पैकी ४२ जागांवर आघाडी घेतल्यानंतर भाजपाचे नेते प्रदेशकार्यालयात जमू लागले आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सचदेव यांच्या नेतृत्वाखाली बैठक सुरू आहे.

10:34 (IST) 8 Feb 2025

BJP Delhi Election Results 2025 Live: मुस्लीमबहुल मतदारसंघातही भाजपा आघाडीवर

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने आघाडी घेतली असून ‘आप’ पक्षाला मोठा धक्का बसताना दिसत आहे. मुस्लीमबहुल मतदारसंघातही भाजपाने आघाडी घेतली आहे. ओखला या मतदारसंघात आजवर भाजपाचा विजय झाला नव्हता. याठिकाणी भाजपाचे मनीष चौधरी आघाडीवर आहेत. तर मुस्तफाबाद येथे भाजपाचे मोहन सिंह बिश्ट आघाडीवर आहेत.

10:05 (IST) 8 Feb 2025

BJP Delhi Election Results 2025 Live: ‘आप’च्या मुख्यमंत्री पराभूत होतायत, भाजपा सरकार स्थापन करणार; भाजपा नेत्याचा दावा

कलाकाजी विधानसभा मतदारसंघातून आप पक्षाच्या नेत्या, मुख्यमंत्री आतिशी सिंह निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपाचे रमेश बिधुरी उभे आहेत. रमेश बिधुरी सध्या आघाडीवर असून त्यांनी भाजपाची सत्ता स्थापन होणार असल्याचा दावा केला आहे.

09:24 (IST) 8 Feb 2025

BJP Delhi Election 2025 Results: भाजपाची १५ जागांवर आघाडी, आप ५ जागी आघाडीवर

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भाजपाने १५ जागांवर आघाडी घेतली आहे, तर आम आदमी पक्ष ५ जागांवर आघाडीवर आहे.

08:40 (IST) 8 Feb 2025

BJP Delhi Election 2025 Results: मतमोजणीदरम्यान भाजपाची २६ जागांवर, तर आप २२ जागी आघाडीवर

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पोस्टल मतदानाची मोजणी झालेली आहे. तसेच ईव्हीएमची मतमोजणीही सुरू झाली असून भाजापने २६, तर आप पक्षाने २२ जागांवर आघाडी घेतली आहे.

08:04 (IST) 8 Feb 2025

BJP Delhi Election Results 2025 Live: निकालावर कोणते घटक परिणाम करणारे ठरतील?

सुप्रशासन आणि कल्याणकारी योजना – ‘आप’ने शिक्षण, आरोग्य आणि योजनांच्या अनुदानावर अधिक लक्ष दिले.

भाजपाचा राष्ट्रीय अजेंडा – भाजपाने राष्ट्रीय विषयांभोवती प्रचार केला. कायदा आणि सुव्यवस्था, केंद्रीय नेतृत्वाला समोर ठेवले गेले.

महागाई आणि स्थानिक मुद्दे – वाढती महागाई आणि स्थानिक मुद्द्यांचा मतदारावर प्रभाव असेल.

नवमतदार आणि युवकांची भूमिका – युवक आणि प्रथम मतदान करणारे नवमतदार काय निर्णय घेतात, यावर निकालाची दिशा ठरेल.

07:36 (IST) 8 Feb 2025

BJP Delhi Election 2025 Results LIVE: सकाळी ८ वाजता मतमोजणीला होणार सुरुवात

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होणार आहे.

03:50 (IST) 8 Feb 2025

आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांच्यावरील आरोप साथ देणार

मागच्या काही काळात भाजपाने दिल्लीत आक्रमक पवित्रा घेत आम आदमी पक्ष आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोंडी केली. नायब राज्यपालांचा हस्तक्षेप, केंद्रीय गृहमंत्रालयाचा वरचष्मा, मद्य घोटाळ्याचे आरोप, भ्रष्टाचार प्रकरणात उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करणे असे अनेक प्रकार दिल्लीत झाले. त्यामुळे या सर्वांचा आता मतदारांवर नेमका किती प्रभाव पडला, हे निकालानंतर कळू शकेल.

01:07 (IST) 8 Feb 2025

उत्तर भारतात दिल्ली सोडून सर्व राज्यात भाजपाचा झेंडा

२०१४ साली नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी भाजपाची कमान हाती घेतल्यापासून अगदी जम्मू आणि काश्मीरमध्ये (२०१५) सत्ता मिळवली होती. तसेच हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यातही भाजपाचे सरकार आले आणि गेले. मात्र दिल्लीत भाजपाला सरकार स्थापन करता आलेले नाही. लोकसभा निवडणुकीत सातही जागा जिंकूनही विधानसभेला मात्र भाजपाचा पराभव होतो. ही सल भीजपाश्रेष्ठींना बोचत आहे.

00:40 (IST) 8 Feb 2025

१९९३ ते १९९८ या काळात भाजपाची सत्ता

भाजपाने १९९३ साली दिल्लीची सत्ता मिळवली होती. पाच वर्षात भाजपाने तीन मुख्यमंत्री बदलले होते. मदन लाल खुराना, साहिब सिंह वर्मा आणि सुषमा स्वराज यांनी मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. पण त्यानंतर १९९८ ते २०१३ पर्यंत काँग्रेसची दिल्लीत सत्ता राहिली. शीला दीक्षित यांनी तीन टर्म मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम केला. तेव्हापासून पुन्हा सत्तेत येण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.

00:16 (IST) 8 Feb 2025

भाजपा २०१५ च्या पराभवाचा वचपा काढणर?

पंतप्रधान मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी २०१५ सालच्या विधानसभा निवडणुकीचे नेतृत्व करूनही भाजपाचा लाजिरवाण पराभव झाला. दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०१३ ला ३२ जागा जिंकणारा भाजपा २०१५ साली केवळ ३ जागांवर आला. या निवडणुकीत आप पक्षान ७० पैकी ६७ जागा जिंकल्या.

23:09 (IST) 7 Feb 2025

भाजपा तीन दशकानंतर सत्ता स्थापन करणार का?

२०१३ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला ३२ जागा मिळाल्या होत्या. बहुमतापासून ते फक्त ४ जागांनी दूर राहिले. तर पहिल्यांदाच निवडणूक लढविणार्या आम आदमी पक्षाला २८ जागा मिळाल्या होत्या. आप पक्षाने काँग्रेसबरोबर आघाडी करत सरकार स्थापन केले. मात्र हे सरकार अल्पावधीतच पडले. २०१५ साली मध्यावधी निवडणुका झाल्या.

21:13 (IST) 7 Feb 2025

Delhi Election 2025 Results LIVE: एक्झिट पोल्समध्ये भाजपाच्या बाजूने कौल

दिल्लीत मतदान पार पडल्यानंतर बहुतेक एक्झिट पोल्सनी सुमारे २७ वर्षांनंतर राजधानी दिल्लीत भाजपाचे सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे शनिवारी निकाल आल्यानंतर एक्झिट पोल्सचे अंदाज खरे ठरतात का? याकडे देशाचे लक्ष लागले आहे. सविस्तर वृत्त वाचा

दिल्लीत विधानसभेच्या मतदानानंतर आलेल्या अनेक एक्झिट पोल्सनी भाजपाची सत्ता येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता.